phone calls threatening to blow up mumbai taj hotel from pakistan security tightened | ताज हॉटेल बॉम्बनं उडवून देऊ! पाकिस्तानमधून धमकीचा कॉल; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

ताज हॉटेल बॉम्बनं उडवून देऊ! पाकिस्तानमधून धमकीचा कॉल; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

ठळक मुद्देमुंबईतील ताज हॉटेल बॉम्बनं उडवण्याची फोनवरून धमकीपोलिसांकडून ताज हॉटेलच्या सुरक्षेत वाढ; सायबर सेलकडून तपास सुरूपाकिस्तानच्या कराचीमधून ताज हॉटेलमध्ये धमकीचा कॉल

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या कराचीमधून धमकीचा फोन आल्यानंतर हॉटेल परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काल कराचीमधल्या शेअर बाजारात हल्ला झाला. आता ताज हॉटेलवर हल्ला करण्यात येईल, अशी धमकी फोनवरून देण्यात आली. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
रात्रीच्या सुमारास ताज हॉटेलमध्ये पाकिस्तानच्या कराचीमधून धमकीचा कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीनं आपण लष्कर-ए-तोयबा संघटनेचे सदस्य असल्याचं सांगितलं. त्यानं ताज हॉटेल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली. याची माहिती पोलिसांना मिळताच हॉटेल परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करू. आमचे सदस्य ताज हॉटेल बॉम्बनं उडवतील, अशी धमकी फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिली. रात्री साडे बाराच्या सुमारास हा कॉल आला होता. तो ताज हॉटेलमधील कर्मचाऱ्यानं उचलला. 

वांद्र्यातील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये धमकीचा दुसरा फोन आल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे. या हॉटेलमध्ये कॉल केलेल्या व्यक्तीनंदेखील तशीच धमकी दिली. हे दोन्ही कॉल एकाच नंबरवरून करण्यात आले होते. ताज आणि ताज लँड्स एन्ड ही दोन्ही हॉटेल्स सध्या कोरोनामुळे बंद आहेत. मात्र या दोन्ही हॉटेलबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत पोलिसांकडून वाढ करण्यात आली आहे. सध्या सायबर सेलकडून याचा तपास सुरू आहे. धमकीचे कॉल नेमके कुठून आले, याची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी दूरसंचार विभागांची मदतही घेतली जात आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. जवळपास ६० तास सुरक्षा यंत्रणांचं ऑपरेशन सुरू होतं. यामध्ये १६६ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. तर ३०० हून जास्त जण जखमी झाले. मृतांमध्ये २८ परदेशी नागरिकांचा समावेश होता. २६/११ चा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी केवळ एकाला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं. दहशतवादी अजमल कसाबची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी करण्यात आली. त्यातून पाकिस्तानचा सहभाग उघड झाला. २१ सप्टेंबर २०१२ रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगात त्याला फाशी देण्यात आली.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: phone calls threatening to blow up mumbai taj hotel from pakistan security tightened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.