Join us
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत जुंपली, आव्हाड म्हणाले पायतान; मुश्रीफांना दाखवली कापशीची चप्पल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 15:17 IST

कोल्हापूरच्या सगळ्या उस्तादांना भेटायला एक वस्ताद आलाय, त्या वस्तादाचं नाव शरदचंद्र पवार साहेब, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती.

मुंबई/कोल्हापूर - कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रस पक्षाची निर्धार सभा पार पडली. या सभेला खासदार शरद पवारांनी संबोधित केलं. या सभेतून शरद पवार यांनी अजित पवार गटावर थेट निशाणा साधला. तर, सभेत बोलत आमदार जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटावर टीका करताना त्यांना गद्दार असं संबोधलं. तसेच,  शरद पवारांना वस्ताद म्हणत हसन मुश्रीफांचे नाव न घेता त्यांना उस्ताद असं संबोधलं. त्यावरुन, आव्हाड आणि मुश्रीफ यांच्यात चांगलाच जुंपली आहे. विशेष म्हणजे ही शाब्दीक चकमक पायताना अन् चप्पलपर्यंत येऊन पोहोचलीय. 

कोल्हापूरच्या सगळ्या उस्तादांना भेटायला एक वस्ताद आलाय, त्या वस्तादाचं नाव शरदचंद्र पवार साहेब, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. तसेच, काहींच्या रक्तातच गद्दारी असते असा घणाघातही आव्हाड यांनी नाव न घेता अजित पवार गटावर केला होता. जे साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात पायतान प्रसिद्घ आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राने करावा, असा टोलाही आव्हाडांनी लगावला होता. या टीकेनंतर हसन मुश्रीफ यांनी आव्हाडांवर पलटवार केला.  

चप्पल बसली की कळेल

जितेंद्र आव्हाड मला फार ज्युनियर आहेत. त्यांनी पवार साहेबांवर काय जादू केली, मला माहित नाही. त्यांनी ठाण्यात पक्ष संपविण्याचं काम केलं. अजित पवार आणि आमच्याविषयी त्यांनी असं बोलायला नको. आम्ही सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांना पत्र दिलं होतं. त्यात ५३ स्वाक्षऱ्या होत्या. त्यात त्यांचीही स्वाक्षरी होती. तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म असा सवाल करत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती बसली की त्यांना कळेल, अशा जशास तसा टोला मुश्रीफ यांनी लगावला होता. त्यानंतर, पुन्हा ट्विट करुन आव्हाड यांनी हसन मुश्रीफ अस्वस्थ झाल्याचं म्हटलं आहे. 

हसन मुश्रीफ अस्वस्थ झाले आहेत

हसन मुश्रीफ साहेब मी कोल्हापूरच्या सभेत आपलं नाव देखील घेतलं नव्हतं. आपण माझ्यावर वैयक्तिक का टीका केली हे समजलंच नाही. कोल्हापूरकरांच्या मनात साहेबांविषयी असलेलं प्रेम त्या ठिकाणी झालेली गर्दी आणि साहेबांचं झालेले स्वागतं, यामुळे तुम्ही अस्वस्थ झालात हे मी समजू शकतो. असुद्या... एका छोट्या कार्यकर्त्यावर एवढ्या मोठ्या व्यक्तीने टिका करणं हे कधीतरी बर असतं, असा खोचक टोमण आव्हाड यांनी मुश्रीफ यांना लगावला.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडहसन मुश्रीफकोल्हापूरराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार