‘शिवाजी पार्क’वरून पक्षांची परस्परांवर धूळफेक; नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:38 IST2025-01-10T14:37:55+5:302025-01-10T14:38:14+5:30

धुळीच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढू!

Parties throw dust at each other over Shivaji Park Newly elected MLA Mahesh Sawant assurance | ‘शिवाजी पार्क’वरून पक्षांची परस्परांवर धूळफेक; नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांचे आश्वासन

‘शिवाजी पार्क’वरून पक्षांची परस्परांवर धूळफेक; नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दादरच्या शिवाजी पार्क मैदानातून उडणाऱ्या धुळीच्या प्रदूषणावरून सुरू असलेले राजकारण आता अधिक तापले आहे. शिंदेसेना आणि उद्धवसेनेने परस्परांवर आरोप केले असतानाच मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, आता स्थानिक आमदार महेश सावंत यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून लवकरच धुळीच्या प्रश्नांवर तोडगा काढणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

शिवाजी पार्क येथील धुळीमुळे परिसरातील नागरिक तसेच मैदानात चालण्यासाठी येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात मनसेने वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढल्यानंतर उद्धव सेनेच्या स्थानिक आमदारांनी पालिका अधिकाऱ्यांसह मैदानाची पाहणी केली. सावंत यांनी माजी आमदार सदा सरवणकर यांच्यावर आरोप केल्यानंतर सरवणकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना घेऊन मैदानाची तपासणी केली. यावेळी कदम यांनी मैदानातील माती अयोग्य असल्याचा ठपका ठेवत आदित्य ठाकरे आणि उद्धवसेनेकडे बोट दाखविले. त्यामुळे मैदानाच्या मातीवरून राजकीय पक्षांनी परस्परांवर आठ दिवसांत चांगलीच धूळफेक केली. मैदानातील धूळ कमी होऊन नागरिकांना आरोग्याच्या कुठल्याही तक्रारी उद्भवू नयेत, यासाठी महापालिका काम करत आहे. मात्र, आणखी उपाययोजना करण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा

  • यासंदर्भात आपण पालिका उपायुक्त आणि विभाग अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आणि त्यांच्याशी चर्चाही केली आहे. धुळीचा त्रास होणार नाही अथवा धूळ निर्माण होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. 
  • पालिका अधिकारी त्यासाठी लवकरच या ठिकाणी येऊन उपाययोजना करणार आहेत. माजी आमदारांनी कधीही विकासाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता केवळ जनतेच्या आरोग्याकडे आणि समस्यांकडेच लक्ष देऊन तोडगा काढणार असल्याचे आ. महेश सावंत यांनी सांगितले.


तुमची लुडबुड कशाला?

दादर फूल मंडई हा विभाग सावंत यांच्या मतदारसंघात येत नाही, मग कशासाठी ते या ठिकाणी येऊन लुडबुड करतात? मराठी व्यापाऱ्यांकडून त्यांना हप्ते मिळत नाहीत म्हणून हा त्यांचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी केला आहे.

मनसेचा फलक का काढला नाही?

  • दादर पश्चिमेच्या मीनाताई ठाकरे फूल मंडईबाहेर असलेले फलक पालिका अधिकाऱ्यांनी काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
  • पण त्यांनी केवळ उद्धवसेनेचा फलक काढला. मनसेचा फलक काढला नाही.
  • याबाबत आपण पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि जर फलक काढायचे असतील तर सर्वांचेच काढा, असे  सांगितले.
  • त्यानंतर फक्त मीनाताई ठाकरे फूल मंडई असा फलक लावण्याचे ठरले आहे, असे आ. सावंत यांनी सांगितले. 

Web Title: Parties throw dust at each other over Shivaji Park Newly elected MLA Mahesh Sawant assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई