लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिका निवडणुकीतील युती आणि आघाडीमुळे सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणूक होत असून, इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच युती - आघाडीमुळे बंडखोरी वाढणार आहे. त्यामुळे यंदा बंडखोरांची समजूत काढणे राजकीय पक्षांना सोपे नाही. त्यामुळे अधिकृत उमेदवारांची घोषणा लांबणीवर टाकण्याची भूमिका सर्वच प्रमुख पक्षांनी घेतली आहे. शेवटच्या क्षणी उमेदवार यादी जाहीर करून बंडखोरीला आवर घालण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे.
पक्षांनी काय केली खेळी?मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी जेमतेम चार दिवस शिल्लक असले तरीही प्रमुख राजकीय पक्षांनी जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवून बंडखोरांना गाफील ठेवण्याची खेळी केली आहे. यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक आहे.
उमेदवारांनी कोणते पर्याय ठेवले समोर?युतीमुळे अनेकांना आपली उमेदवारी कापली जाण्याची भीती आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास इच्छुकांनी शिंदेसेना आणि भाजपचा पर्याय समोर ठेवला आहे. पक्षातील ही संभाव्य बंडखोरी लक्षात घेऊन दोन्ही ठाकरे बंधूंनी जागावाटप आणि उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, अशांना तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.
महायुतीचे लक्ष ठाकरे बंधूंच्या उमेदवार यादीकडेमहायुतीनेही शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार आणि जागावाटप गोपनीय ठेवण्याची भूमिका घेतली आहे. भाजप व शिंदेसेनेला मुंबईत बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय उद्धवसेना आणि मनसेचे प्रबळ उमेदवार दोन्ही पक्षाच्या संपर्कात आहेत. उमेदवारी न मिळाल्यास हे तगडे उमेदवार महायुतीत उडी मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप - शिंदेसेनेचे लक्ष ठाकरे बंधूंच्या उमेदवार यादीकडे आहे.
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी दिल्लीत ठरणारमुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवत आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची यादी दिल्लीहून निश्चित होईल. उमेदवार यादीत शेवटच्या क्षणापर्यंत घोळ घालण्याची काँग्रेसची परंपरा आहे. याशिवाय मुंबईतील काही प्रभाग असे आहेत, जेथे काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाहीत. अशा प्रभागात अन्य पक्षातील उमेदवारांना किंवा बंडखोरांना काँग्रेसच्या चिन्हावर उभे करण्याची रणनीती आहे.
Web Summary : Parties fear rebellion due to alliances in municipal elections. Delaying candidate announcements aims to thwart potential uprisings. Strong candidates from other parties might join Mahayuti if denied tickets. Congress considers fielding rebels.
Web Summary : नगर निगम चुनावों में गठबंधन के कारण दलों को बगावत का डर है। संभावित विद्रोह को रोकने के लिए उम्मीदवार घोषणा में देरी। टिकट से वंचित होने पर अन्य दलों के मजबूत उम्मीदवार महायुति में शामिल हो सकते हैं। कांग्रेस बागी उम्मीदवारों को मैदान में उतारने पर विचार कर रही है।