पँथरचा महानायक काळाच्या पडद्याआड, राजा ढाले यांचे निर्वाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 06:00 AM2019-07-17T06:00:25+5:302019-07-17T06:00:33+5:30

राजा ढाले यांच्या आकस्मिक निधनानंतर दलित पँथरचा इतिहास आणि त्यातील त्यांची अग्रणी भूमिका विशद करणारे लेख आणि मेसेज आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात फिरू लागले.

Panther's splendid splendor of the era of King, Nirvana of King Dhale | पँथरचा महानायक काळाच्या पडद्याआड, राजा ढाले यांचे निर्वाण

पँथरचा महानायक काळाच्या पडद्याआड, राजा ढाले यांचे निर्वाण

Next

मुंबई : राजा ढाले यांच्या आकस्मिक निधनानंतर दलित पँथरचा इतिहास आणि त्यातील त्यांची अग्रणी भूमिका विशद करणारे लेख आणि मेसेज आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात फिरू लागले. चळवळीला बौद्धिक अधिष्ठान देणारा, शुद्ध आंबेडकरी बुद्ध धम्म विचारांच्या आधारे समाज घडावा, अशी त्यांची आग्रही भूमिका होती. धम्म परिषदा,आंबेडकरी साहित्य सम्मेलने आदी माध्यमातून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले.
राजा ढाले यांचा जन्म १९४० साली सांगलीजवळच्या नांद्रे या गावी झाला. वयाच्या सहाव्या वर्षी आपल्या चुलत्यांसोबत त्यांनी मुंबई गाठली. वरळीच्या बीडीडी चाळीतील सहकाऱ्यांसह त्यांनी ‘महाराष्ट्र दलित साहित्य संघ’ या संस्थेची स्थापना केली. १९५८ मध्ये या संस्थेच्या माध्यमातून पहिले साहित्य संमेलन भरवले. साठच्या दशकात सत्यकथा या प्रतिष्ठित मासिक आणि एकूणच साहित्यातील साचलेपणावर टीका करणारी ‘सत्यकथेची सत्यकथा’ हा त्यांचा लेख विशेष गाजला. महाराष्ट्रातल्या एका खेड्यात दलित तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर, ‘भारतीय स्वातंत्र्यालाच प्रश्न करणारा काळा स्वातंत्र्य दिन’ हा लेखही त्यांनीच लिहिला.
दलित समाजावरील अन्याय अत्याचारांविरोधात केवळ दलित साहित्य पुरेसे नाही. त्याला कृतीरूप देण्यासाठी अमेरिकेच्या ‘ब्लॅक पॉवर’ या कृष्णवर्णीय तरुणांच्या संघटनेच्या धर्तीवर यविक आघाडीची सुरुवात झाली. पुढे त्याचेच रूपांतर दलित पँथरमध्ये झाले. १९७४ साली वरळीतील दंगलीनंतर राज्यभर दलित पँथरच्या नावाची चर्चा सुरू झाली. सोबतच पँथरचा नेमका संस्थापक कोण, यावरूनही वादंग निर्माण झाले. तापसी, येरु, चक्रवर्ती, जातक, विद्रोह अशा अनियतकालिकांत ढाले यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. केवळ साहित्य निर्मिती, लेखन करून अन्यायाचा मुकाबला होणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा मार्ग सत्तरच्या दशकातील तरुणांना दाखवत, पँथरच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला त्यांनी नवा आयाम दिला. वयाच्या ७८ वर्षी त्यांच्या आकस्मिक निधनाने पँथरचा महानायक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
परिवर्तनवादी चळवळींचा भाष्यकार हरपला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजा ढाले हे समतेसाठीच्या चळवळीतील एक अभ्यासू आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व होते. दलित पँथरच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या आकांक्षांना त्यांनी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पँथर चळवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व आहे. सत्तरीच्या दशकात या चळवळीने केलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीला एक नवा आयाम देणारा ठरला होता. त्यांच्या निधनाने एक लढाऊ नेता, प्रतिभावंत साहित्यिक आणि परिवर्तनवादी चळवळींचा महत्त्वाचा भाष्यकार आपण गमावला आहे.
मार्गदर्शक नेता काळाच्या पडद्याआड
लेखक, विचारवंत आणि ज्येष्ठ नेते राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे कार्यकर्ते व एक मार्गदर्शक नेते काळाच्या पडद्याआड गेले. दलित पँथरच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. ढाले यांच्या निधनाने दलित चळवळ, बौद्ध साहित्यविश्व आणि आंबेडकरी विचार चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री
लढवय्या ‘पँथर’
काळाच्या पडद्याआड!
आक्रमक बाणा, परखड विचार आणि विचारधारेवर असलेल्या प्रगाढ विश्वासामुळे ते एक अतिशय लोकप्रिय नेते व लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते. सामाजिक चळवळीसोबतच साहित्य क्षेत्रातही राजा ढाले यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीची प्रचंड हानी झाली असून, ते कायम लाखो कार्यकर्त्यांच्या स्मरणात राहतील.
- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
बौद्धिक पातळीवरच्या लढ्याची प्रेरणा देणारा नायक
राजा ढाले यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे धक्का बसला आहे. बौद्धिक पातळीवरच्या लढ्याची प्रेरणा देणारा असा नायक होता. आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात राजा ढाले हे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. राजा ढाले चांगले कवी, वाचक, संपादक, लेखक होते. तर्कशास्त्रावर त्यांची मोठी पकड होती. राजा ढाले यांनी दलित चळवळीला बौद्धिक पातळीवरच्या संघर्षाची प्रेरणा दिली. लोकांच्या प्रश्नावर लढाई करणारा हा माणूस होता. दलित पँथर किंवा त्यांनी स्थापन केलेल्या मास मूव्हमेंट संघटनांचा पुढे कित्येक वर्षे कार्यकर्त्यांवर मोठा प्रभाव राहिला. या पार्श्वभूमीवर राजा ढाले यांचे अकाली जाणे चटका लावणारे आहे.
- अविनाश महातेकर
आंबेडकरी चळवळीचा
महानायक हरपला
दलित पँथरच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला आक्रमकता बहाल करणारे वादळ शांत झाले आहे. राजा ढाले हे जागतिक दर्जाचे साहित्यिक, विचारवंत होते. आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध तत्त्वज्ञानासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. परखड मत व्यक्त करणारे, झुंजार प्रभावी वक्ते आणि नेते होते. केवळ साहित्यनिर्मिती, लेखन करून अन्यायाचा मुकाबला करायचा नाही, तर अन्यायाचा प्रतिकारही करायचा. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा मार्ग त्या काळच्या सत्तरीच्या दशकातील तरुण पिढीला राजा ढाले यांनी शिकविला. दलित पँथर या आक्रमक संघटनेमुळे आंबेडकरी चळवळ अधिक आक्रमक आणि वैचारिक चळवळ झाली. राजा ढाले यांच्या निधनाने समाजाला दिशा देणारा कृतिशील विचारवंत, आंबेडकरी चळवळीचा मार्गदर्शक हरपला आहे.
- रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री
दलित चळवळीतील योद्धा हरपला!
राज ढाले यांच्या निधनाने बौद्ध साहित्यविश्व
आणि दलित चळवळीचे मोठे नुकसान झाले
आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आयुष्यभर ठाम राहून कडवा संघर्ष करणाºया नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. समाज, संस्कृती आणि राजकारणाचा अभ्यासक अशी त्यांची ओळख होती. अन्याय आणि अत्याचाराविरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठविला. राजा ढाले यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांची उणीव कायम जाणवत राहील.
- विजय वडेट्टीवार

विद्रोहाची धग समाजापर्यंत नेणारा नायक काळाच्या पडद्याआड
राजा ढाले हे फुले-आंबेडकरी विचारसरणीचे साठोत्तर कालखंडातील एक महत्त्वाचे नेते होते. विद्रोही साहित्याची धग समाजापर्यंत पोहोचविणाऱ्यांत राज ढाले यांचे नाव सर्वात पुढे होते. ढाले यांच्या जाण्याने पँथरचा एक झंझावात संपला आहे. पँथरची चळवळ राज्यात वाºयासारखी वाढली, पसरली, त्यामागे ढाले यांची बौद्धिक भूमिका महत्त्वाची ठरली. ढाले यांनी शेवटपर्यंत आंबेडकरी चळवळीचा वाटाड्या म्हणून कार्य केले. दु:खाच्या सार्वत्रिकतेचा शोध घेणारा हा महान क्रांतिकारक आज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी इतिहासात मात्र अजरामर राहणार आहे. - सचिन अहिर
धडाडीचा नेता गमावला
राजा ढाले हा धडाडीचा नेता होता. त्यांनी साहित्याचा विविध अंगांनी विचार केला होता. कविता, वैचारिक लेखन असे वैविध्य त्यांनी जपले. आपल्या लिखाणाने आणि धडाडीने त्यांनी तरुणांच्या मनावर अनभिषिक्त राज्य केले. दलित पँथरमार्फत त्यांनी आंबेडकरी चळवळीला दिशा दिली. राजा ढाले यांच्या कार्याची इतिहासात आवर्जून नोंद घेतली जाईल.
- डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत
आंबेडकरी चळवळीतील स्वतंत्र पर्व
आंबेडकरी पर्वानंतर आरपीआयची दूरवस्था झाली होती. त्यावेळी दलितांच्या उध्दार आणि उत्थानासाठी राजा ढाले यांनी क्रांतिकारी प्रेरणा दिली. दलित पँथरचे ते संस्थापक होते. आंबेडकरवादी तरुणांचा क्रांतिकारी उन्मेष त्यांच्या संघटनेतून, भूमिकेतून पुढे आला. तत्वज्ञ म्हणून त्यांची बुध्दवादी भूमिका शेवटपर्यंत कायम राहिली. राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीतील स्वतंत्र पर्व म्हणावे लागेल.
- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष
चालतं बोलतं विद्यापीठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे हा शासनाच्या साहित्य प्रकल्पाच्या संपादकपदाची जबाबदारी माझ्याकडे आली. त्या निमित्ताने राजा ढाले यांच्याशी अनेक भेटी आणि चर्चा झाल्या. त्यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना त्यांनी दलित आणि आंबेडकरवादी साहित्याबद्दल केलेले भाषण खूप गाजले. त्यांचे सखोल वाचन, स्वतंत्र विचार आणि धाडसी मांडणी थक्क करणारी होती. त्यांच्या बंडखोरीला रचनात्मकतेचा पदर होता. राजा ढाले आपल्या मांडणीतून पर्यायी समाजाचे चित्र उभे करायचे. राजा ढाले हे चालतेबोलते विद्यापीठ होते. त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे आहे.
- प्रा. हरी नरके, लेखक आणि विचारवंत
वैचारिक लढ्याची अपरिमित हानी
राजा ढाले यांच्या निधनाने फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समताधिष्ठित परिवर्तन लढ्याची अपरिमित हानी झाली आहे. अन्याय, अत्याचारांविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे ऊर्जा केंद्रच त्यांच्या निधनाने आम्ही गमावून बसलो आहोत. साहित्य, संस्कृती व कला यांना संघर्षाचे सौंदर्य लेणे प्रदान करण्याचे त्यांचे कार्य अतुलनीय असेच होते. शुद्ध आंबेडकरी बुद्ध धम्म विचारांशी बांधिलकी पत्करून त्यानुसार समाज घडावा अशी त्यांची आग्रही भूमिका होती. तत्त्वांशी तडजोड करणे त्यांना कधीच मान्य नव्हते. धम्म परिषदा, आंबेडकरी साहित्य संमेलने आदी माध्यमातून तरुणांना व समाजाला दिशा देण्याचे त्यांचे कार्य मूलभूत स्वरूपाचे होते.
- प्रा. जोगेन्द्र कवाडे
भीम आर्मीचा प्रेरणास्रोत हरपला
आंबेडकरी चळवळीचे आदर्श असणारे

Web Title: Panther's splendid splendor of the era of King, Nirvana of King Dhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.