Join us

पक्ष आणि चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन, केलं सूचक विधान, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 09:50 IST

Pankaja Munde & Uddhav Thackeray: भाजपाचे जवळपास सर्वच नेते उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. मात्र भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांची विचारपूस केल्याची बातमी समोर येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तर सध्याच्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं पारडं जड झालं आहे. या घडामोडींनंतर भाजपाचे जवळपास सर्वच नेते उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. मात्र भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांची विचारपूस केल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

२०१९ मध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यापासून ते भाजपाच्या निशाण्यावर होते. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडाला मदत करत भाजपाने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. दरम्यान, उद्धव ठाकरेंकडून पक्ष चिन्ह गेल्यानंतर भाजपाचे इतर नेते उद्धव ठाकरेंना निशाण्यावर घेत असतान पंकजा मुंडेंनी मात्र त्यांच्याशी संवाद साधला. माझं उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून बोलणं झालं. मात्र त्यात काय चर्चा झाली, याचा तपशील मी सांगणार नाही, असं सूचक विधान त्यांनी याबाबतची माहिती देताना केलं.

सध्याचा काळ हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांसाठी कसोटीचा आहे. एक सामान्य कार्यकर्ता हा नेत्याचा वारसदार होऊ शकतो, हा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. सध्या ते सत्तेत असल्यामुळे सोबत असलेल्या नेत्यांना निवडून आणण्याची मोठी संधी त्यांच्याकडे आहे. मात्र पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर नव्याने पक्ष उभारण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 

टॅग्स :पंकजा मुंडेउद्धव ठाकरेमहाराष्ट्रराजकारण