Join us  

राष्ट्रवादीचा पाठिंबा घेताना पंकजाताईंना विश्वासात घेतलं का? प्रितम मुंडे म्हणाल्या... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 5:27 PM

पंकजा मुंडेंच्या वेट अँड वॉच भूमिकेमुळे राज्यातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे

मुंबई - भाजपावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे उद्या गोपीनाथ गडावरुन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्या गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडे समर्थक कार्यर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रितम मुंडेंनीही वेट अँड वॉच असेच म्हटलंय. तसेच, पंकजा मुंडेच उद्या भूमिका जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले. 

पंकजा मुंडेंच्या वेट अँड वॉच भूमिकेमुळे राज्यातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात संघर्षयात्रा काढली. राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात महाराष्ट्र पिंजून काढला. त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाने राज्यात सरकार स्थापन केले होते. राष्ट्रवादीचा हा पाठिंबा घेताना, पंकजा मुंडेंना विश्वासात घेतलं होतं का? असा प्रश्न भाजपाच्या खासदार प्रितम मुंडेंना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतील काही निर्णय, बातम्या बाहेर लीक करता येत नाहीत, असे प्रितम यांनी म्हटलं.  

खासदार प्रितम मुंडेंनी कोअर कमिटीचे निर्णय अतिशय कॉन्फिडेन्शियल असतात. क्लासिफाईड इन्फॉरमेशन ज्याला आपण म्हणतो. मुंडेंसाहेबांच्या संस्काराप्रमाणेच आम्ही लोकांमध्ये जाऊन कामं करतो, तसंच आम्ही पक्षातील कामासंदर्भातही खूप प्रोफेशनल आहोत. जसं की, कोअर कमिटीच्या बैठकीला मी जाऊ शकत नाही, तसं या बैठकीतील बातम्याही ते बाहेर लीक करु शकत नाही. पक्षातील संसदीय कामकाजाचा आम्ही सन्मान करतो. त्याचा अवमान होईल, असं कुठलंही कृत्य आम्ही करत नाही. कोअर कमिटीच्या बैठकीतील मुद्द्यांची, मी बहिण आहे म्हणून घरी येऊन त्या माझ्याशी चर्चा करतील, एवढ्या इनमॅच्युरल वातावरण आमच्याकडे नाही. दरम्यान, आपल्याला विचारलेल्या प्रश्नावर सावधगिरीने उत्तर देताना, थोडसं राजकारण तर मी शिकलेच असेल, दुसरी टर्म आहे खासदरकीची, असेही प्रितम मुंडेंनी म्हटले आहे. 

टॅग्स :पंकजा मुंडेप्रीतम मुंडेगोपीनाथ मुंडेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस