“सुरेश धस काही संबंध नसताना सतत माझा उल्लेख करतात, त्यांना समज द्यावी”: पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:38 IST2025-03-12T14:36:08+5:302025-03-12T14:38:41+5:30
Pankaja Munde Vs Suresh Dhas: मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा केली असून, सुरेश धस यांना समज द्यावी, अशी विनंती केली आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांनी सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

“सुरेश धस काही संबंध नसताना सतत माझा उल्लेख करतात, त्यांना समज द्यावी”: पंकजा मुंडे
Pankaja Munde Vs Suresh Dhas: ते माझे नाव घेऊन जी चर्चा करत आहेत, त्यावर मी माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. ज्या विषयाशी कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणे, टिप्पणी करणे त्यांच्याकडून अपेक्षित नाही. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहोचू नये, म्हणून मी चार-पाच महिने गप्प बसले, पण आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की, त्यांना समज द्यावी, असे सांगत पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्याबद्दलची नाराजी उघडपणे बोलून दाखवली.
विधान भवनात पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर पलटवार करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सुरेश धस यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्यावर केला होता. या आरोपाला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, नागपूर अधिवेशनापासून गप्प बसले. पण आता मी पक्षश्रेष्ठींकडे सुरेश धस यांना समज देण्याची विनंती केली आहे. मी प्रचार केलाय की नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पाहा. या राज्यात अनेक लोक भाजपशी निगडीत होते, ते अपक्ष उभे राहिले. मंचावर जाऊन मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. त्यांनी असा आरोप करायला नको होता, असे पंकजा मुंडे यांनी नमूद केले.
सुरेश धस यांनी आत्मपरीक्षण करावे
प्रचार करताना त्यांनी माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्या नेत्याचे नाव घेतले नाही. त्यामुळे निकाल लागल्यावर असे आरोप करणे, चुकीचे आहे. जो व्यक्ती ७५ हजार मतांनी निवडून आला आहे, काम केले नाही, तर कसे शक्य होईल याचे त्यांनी आत्मपरिक्षण करावे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच लोकसभेला जे माझे लीड होते, ते अर्ध्यापेक्षा कमी झाले, मग त्यांनी माझे काम केले नाही असे म्हणायच का? त्यांनी जाहीरपणे असे बोलणे हे पक्षश्रेष्ठींना, पक्ष शिस्तीला मान्य नाही. निवडून आल्यावर माझ्याविषयी बोलले. विधानसभेचा निकाल लागला तेव्हापासून आजपर्यंत बोलण्याच टाळले. पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की, त्यांना समज द्यावी हे खरे आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच 'खोक्या' उर्फ गुंड सतीश भोसले याचे काही गैरप्रकार आणि पैशाचा माज दाखवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्याने एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचेही प्रकरण समोर आले होते. तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचेही स्पष्ट झाले होते. सहा दिवसांपासून पोलीस शोध घेत असताना अखेर खोक्याला प्रयागराजमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून ही अटक झाली.