"पंकजा-धनंजयने आमची जमीन हडपली, वाल्मीक कराडच्या..."; सारंगी महाजनांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:23 IST2025-01-08T17:22:32+5:302025-01-08T17:23:45+5:30
मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला.

"पंकजा-धनंजयने आमची जमीन हडपली, वाल्मीक कराडच्या..."; सारंगी महाजनांचा आरोप
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरुन राज्यभरात निदर्शने सुरू आहेत.दरम्यान, खंडणी प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणाऱ्या वाल्मीक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतले आहे. राजकीय वर्तुळात या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सुरू आहेत. आता सारंगी महाजन यांनीही जमीन हडपल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याच संदर्भात भेट घेणार असल्याची माहिती दिली.
"धनंजय मुंडे म्हणजे..."; बीड प्रकरणावरून टीका करताना उत्तम जानकरांची जीभ घसरली
"आज मी सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. सकाळी अजितदादा यांची भेट घेतली. जिरेवाडीतील माझी जमीन धनंजय मुंडे आणि त्याच्या माणसांनी हडपली आहे. गोविंद मुंडे या व्यक्तीने माझ्याशी संपर्क करुन माझी जमीन हडप केली. त्यांनी आम्हाला प्रॉपर धाक दाखवून रजिस्ट्री लावून जमीन हडपली. रजिस्ट्री होत नाही तोपर्यंत त्यांनी आम्हाला सोडलं नाही, त्यांनी शंभर रुपयांच्या बॉन्डवर सह्या करुन घेतल्या. सही केली नाहीतर परळी सोडू देणार नाही असा धाक दाखवला, असा आरोप सारंगी महाजन यांनी केला.
सारंगी महाजन म्हणाल्या, आम्ही १४ वर्षापासून यांच्या पाठिमागे आलेलो नाही. आमचं आम्ही राहत होतो. यांना आमच्या नावाची जमीन हडप करण्याचे कारण काय होते? यामध्ये पंकजा आणि धनंजयचा हात आहे, असा दावा महाजन यांनी केला.त्यांनी ६ जून २०२२ ला रजिस्ट्री लावून घेतली आणि कागदपत्र नंतर पाठवून दिली. त्या कागदपत्रांमध्ये त्यांनी जमिनीचा व्यवहार झाला असं लिहिले होते. आता मी कोर्टात केस दिली आहे, असंही महाजन म्हणाल्या.
" साडे तीन कोटीची जमीन त्यांनी २१ लाखात घेतली, हा फ्रॉड झाल्याचे लक्षात आले. त्यांनी माझी जमीन दाखवलीच नाही. मी पंधरा दिवसात जमीन बघून आलो, त्यांनी जमिनीचा सात बारा बदलून टाकला होता. नियमाप्रमाणे पंधरा दिवसांनी सातबारा बदलतो पण त्यांनी आधीच सगळा बदलून टाकला. या सगळ्या प्रकरणाची मी केस केली आहे. ही जमीन गोविंद मुंडे, पल्लवी गिते आणि दशरथ चाटे यांच्या नावावर आहे, या तिघांनाही मी ओळखत नाही. गोविंद मुंडे हे धनंजय मुंडे यांच्या घरचे नोकर होते. नंतर ते नगरसेवक झाले, आता त्यांची मोठी माया आहे, असंही महाजन म्हणाल्या.
धनंजय मुंडेंच्या नोकराच्या नावे जमीन
सारंगी महाजन म्हणाल्या, मी धनंजय मुंडे यांच्याकडे या प्रकरणासाठी गेले होते, तेव्हा ते टाळाटाळ करत होते. माझ्याकडे यायला पाहिजे होता, परस्पर जमीन विकून टाकली. तुमचा फॉलोअप कमी पडला, असं धनंजय मुंडे मला म्हणाले. त्यांचं हे मी ऐकून ते मला त्रास देत असल्याचे जाणवले. मी परळीत गेले की ते परळीतून बाहेर जायचे. दिड वर्ष त्यांनी असंच केले. मी परळीचा किंग आहे, परळीत जमीन विकली की मला लगेच कळतं, माझ्याशिवाय कोणाच्या जमिनी विकल्या जात नाही, असं धनंजय मुंडे मला बोलले, त्यावर मी माझ्या जमिनीमध्ये यांचा हात असेल हे समजून गेले, नंतर मला वाटलं ज्याने माझी जमीन लाटली आहे त्याच चोराकडे मी आली आहे, असंही सारंगी महाजन म्हणाल्या.
वाल्मीक कराडच्या मुंडांनी दिली धमकी
सारंगी महाजन म्हणाल्या, या प्रकरणात कधी वाल्मीक कराडची भेट झाली नाही. पण, यात वाल्मीक कराडचा हात असू शकतो. कारण ते वाल्मीक कराडला सांगतात, ते खाली त्यांच्या माणसांना सांगतात. मला त्या लोकांनी धाक दाखवला होता, असा दावाही महाजन यांनी केला.