Pallets of air guns in X-rays of dog; he death after treatment | श्वानाच्या एक्सरेमध्ये एअर गनच्या पॅलेट्स; उपचाराअंती श्वानाचा मृत्यू

श्वानाच्या एक्सरेमध्ये एअर गनच्या पॅलेट्स; उपचाराअंती श्वानाचा मृत्यू

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : पवईतील एका उच्चभ्रू इमारतीत एअर गनने श्वानाला ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली आहे. श्वानाच्या एक्सरेमध्ये एअर गनच्या दोन पॅलेट्स मिळाल्या आहेत. त्यानुसार, पवई पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

पवईत पेट केअरिंगचा व्यवसाय करणाऱ्या श्वेताली मुळीकयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्या लेक फ्लोरेन्स, लेक होम येथे राहतात. त्यांच्या इमारतीतच एक फिकट तपकिरी रंगाचा भटका कुत्रा होता. त्याला सगळे ब्राउनी नावाने ओळखायचे. तो मागील ७ ते ८ वर्षांपासून इमारतीच्या आवारातच राहायचा. २५ नोव्हेंबर रोजी ब्राऊनी आजारी पडल्याने सोसायटीतील महिलेने त्याला रुग्णालयात नेले. त्याच्यावर औषधोपचार करून सोसायटीच्या पार्किंगमध्ये सोडले. पुढे त्याच्या जेवणाची नियमितपणे काळजी घेणे सुरू झाले.

५ डिसेंबर रोजी ब्राऊनी जास्तच अशक्त दिसू लागला. त्याने खाणे-पिणे बंद केले. तरीही त्याला कसेबसे जेवण भरविण्याचे प्रयत्न सुरू होते. पुढील औषधोपचारांसाठी खारच्या योडा अ‍ॅनिमल एनजीओ शेल्टर येथे नेण्यात आले. तेथून त्याला अन्य व्हेटर्निटी स्पेशालिटी येथे पाठवून तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर औषधोपचार केले. तेथे ब्राऊनीचा एक्सरे काढण्यात आला. त्यात त्याच्या शरीरामध्ये एअर गनच्या दोन पॅलेट्स दिसून आल्या.

ही बाब समजताच सर्वांना धक्काच बसला. त्याच दरम्यान उपचारादरम्यान ११ तारखेला ब्राऊनीचा मृत्यू झाला. कोणी तरी एअर गनने ब्राऊनीला ठार मारल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. याबाबत तक्रारदार व्यावसायिक महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.त्यातही १ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास त्याच परिसरात राहणाºया बलदेव बजाज यांच्या कारच्या काचा फोडल्याची घटना घडली. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये एकाच व्यक्तीचा हात असल्याचा संशयही वर्तविण्यात येत आहे.

तपास सुरू

श्वानाच्या मृत्यूप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली.

विकृतीची सीमा ओलांडली

आमच्या सोसायटीत २० हून अधिक श्वान आहे. ब्राऊनीही गेल्या ८ वर्षांपासून येथेच राहायचा. त्यात, त्याच्यासोबत केलेल्या कृत्याने विकृतीची सीमा ओलांडली आहे. या घटनेने आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. आमचा श्वान तर गेला, मात्र संबंधित आरोपीला शिक्षा होणे गरजेचे आहे. तसेच अन्य श्वानांचेही एक्सरे काढण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांच्यासोबतही असे काही झाले आहे का? याबाबत माहिती मिळू शकेल.
- श्वेताली मुळीक, तक्रारदार, प्रोप्रायटर, बार्क इन

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pallets of air guns in X-rays of dog; he death after treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.