Over 9,000 infants lost their lives in eight months across the state | राज्यभरात आठ महिन्यांत ९ हजारांहून अधिक नवजात बालकांनी गमावला जीव
राज्यभरात आठ महिन्यांत ९ हजारांहून अधिक नवजात बालकांनी गमावला जीव

- स्नेहा मोरे 

मुंबई : बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत, मात्र तरीही राज्यात मागील आठ महिन्यांत ९ हजार ६५७ नवजात बालकांचा मृत्यू ओढावला आहे. त्यात सर्वाधिक म्हणजेच ९६२ मृत्यूंची नोंद मुंबईत झाली आहे. मात्र यात स्थलांतरित रुग्णांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईखालोखाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात ६९१ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.

माहिती अधिकारातून एप्रिल ते नोव्हेंबर या काळातील ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्यात वर्षाला १५ लाख बालकांचा जन्म होतो. त्यापैकी सुमारे आठ लाख बालकांचा जन्म हा आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये होतो. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०१८-१९ मध्ये १६ हजार ५३९ बालकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून यातील बहुतेक मृत्यू हे जंतुसंसर्ग, न्यूमोनिया तसेच जन्मत: वजन कमी असल्यामुळे आणि श्वसन विकारांमुळे होतात, असे स्पष्ट झाले आहे.

बालमृत्यूदर कमी करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पण, अनेकदा रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक अर्भकांचा अतिदक्षता विभागात संसर्गामुळे मृत्यू होतो. तसेच मुदतपूर्व प्रसूती झाल्यामुळे, जन्मत: संसर्ग झाल्याने, व्यंग असल्याने या जन्मजात बाळांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे.

अशा परिस्थितीत नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागांची. या अतिदक्षता विभागात त्यांची योग्य काळजी व उपचार करणे शक्य होते, असे समोर आले आहे.
याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शीला शेणवी यांनी सांगितले की, प्रसूतीवेळी निर्माण होणारी गुंतागुंत तसेच जंतुसंसर्ग, जन्मजात आजार यावर तातडीने उपचार होणे आवश्यक असते.

नवजात बालकांमधील मृत्यू आणि आजार नियंत्रित करण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच शासनमान्यता असलेल्या खासगी लसीकरण संस्थांमध्ये सर्व नवजात बालकांना जन्मानंतर लगेच अथवा २४ तासांच्या आत हिपॅटायटिस बी, झीरो पोलिओ, व्हिटॅमिन के आणि वर्षभराच्या आत शक्य तितके बीसीजीचे लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारांकडून त्यासाठी देण्यात आलेली आर्थिक तरतूद कमी पडते आहे, आरोग्य सुधारण्यासाठी आर्थिक तरतुदीत वाढ व्हावी.

भारतातील चारपैकी एक बालक कुपोषित

ग्लोबल हंगर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, जगभरातील नवजात बालकांच्या मृत्यूपैकी ३० टक्के मृत्यू भारतात होत असल्याचे समोर आले आहे. देशातील ३०.७ टक्के लहान मुले पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे अपेक्षित वजनापेक्षा कमी वजनाचे आहेत. तर ५८ टक्के बालकांचा विकास दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे असतानाच थांबतो. याशिवाय भारतातील चारपैकी एक बालक कुपोषित असल्याचे म्हटले आहे. जागतिक पातळीवर २.५ दक्षलक्ष नवजात बालके आईच्या गर्भातच दगावतात.

बालकांच्या मृत्यूची कारणे

मुदतपूर्व प्रसूती च्गर्भातच गुदमरून मृत्यूसंसर्गामुळे मृत्यू अवयवांची वाढ न होणे
जन्म झालेल्या बालकांपैकी काहींना वेळीच औषधोपचार न मिळणे

आकडेवारी

जिल्हा        २०१९-२०       २०१८-१९
मुंबई            ९६२             १,२६७
नागपूर         ६९१            ३६५
पुणे              ५०९            ७६५
अकोला        ५०९            ६२९
औरंगाबाद    ५५८           ६९५

Web Title: Over 9,000 infants lost their lives in eight months across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.