संतापजनक! डॉक्टरने नव्हे, परिचारिकेने केली प्रसूती; नवजाताचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 08:01 IST2025-10-25T08:01:15+5:302025-10-25T08:01:33+5:30
वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याचा कुटुंबाचा आरोप

संतापजनक! डॉक्टरने नव्हे, परिचारिकेने केली प्रसूती; नवजाताचा मृत्यू
रवींद्र साळवे, लोकमत न्यूज नेटवर्क, मोखाडा : वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रसुतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना मोखाडाच्या ग्रामीण रुग्णालयात घडली. एका परिचारिकेने गर्भवतीची प्रसुती केली. यावेळी एकही वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर उपलब्ध नव्हता. या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आणि गर्भवतीकडे दुर्लक्ष झाल्याने तिच्या जिवालाही धोका निर्माण झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही लावून धरली आहे.
वैशाली अशोक बात्रे या गर्भवतीला रुग्णालयात बुधवारी सकाळी दाखल केले होते. असह्य प्रसुती वेदना जाणवू लागल्याने तिची रात्री १० च्या दरम्यान प्रसुती केली गेली. मात्र, तिच्या बाळाचा मृत्यू झाला. प्रसुतीदरम्यान डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे असूनही डॉक्टर नव्हते. केवळ एक परिचारिका उपलब्ध होती, तसेच सकाळपासून गर्भवतीवर योग्य उपचार न केल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
असह्य प्रसुती वेदना जाणवल्यानंतर तिची प्रसुती रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. परंतु, यादरम्यान, तब्बल १२ तास तिची कोणत्याही प्रकारे काळजी घेतली गेली नाही. प्रसुतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला. त्या बालकाला दोनच नाळ होत्या तसेच बाळाची वारही सुस्थितीत नव्हती. विशेष म्हणजे ही बाब खोडाळा येथील सोनोग्राफीमध्ये समोर आली होती.
याेग्य सल्लाच नाही
या ठिकाणी कोणतेही प्रसुतीतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे वेळीच योग्य सल्ला मिळाला नाही व प्रसुतीत मोठी प्रतीक्षा करावी लागली. तसेच प्रसुती उपचारांत मृत बालक आणि गर्भवतीला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही रुग्णालय प्रशासनाने केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे.
माझ्या पत्नीला बुधवारी सकाळी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी नव्हते. एका परिचारिकेच्या भरवशावर रुग्ण ठेवण्यात आले होते. दिवसभरात तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. तिला वेळेतच पुढील रुग्णालयात पाठविण्यात आले असते तर आज माझे बाळ जिवंत असते.- अशोक, गर्भवती वैशालीचे पती.
महिलेच्या बाळाला तीन नाळ असणे अपेक्षित असते. तसेच वारही सुस्थितीत असावी लागते, अन्यथा प्रसुतीदरम्यान बाळ दगावण्याची शक्यता दाट असते. बाळाची त्वचा पिवळसर असल्याने बाळ दगावले. -डॉ. भारतकुमार महाले, रुग्णालय अधीक्षक, मोखाडा ग्रामीण रुग्णालय.