शाळाबाह्य ‘अल्फीया’ने केले संधीचे सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 12:53 AM2020-03-15T00:53:12+5:302020-03-15T00:55:04+5:30

बालरक्षक रामराव पवार यांच्या मदतीने महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळविलेल्या अल्फीयाने आज बालरक्षक टीमची आणि आईवडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे.

 Out of school 'Alfia' made record | शाळाबाह्य ‘अल्फीया’ने केले संधीचे सोने

शाळाबाह्य ‘अल्फीया’ने केले संधीचे सोने

Next

- सीमा महांगडे
मुंबई : एकेकाळी शाळेची फी भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून अल्फीयाला चौथीतच शिक्षण सोडावे लागले होते़ बालरक्षक रामराव पवार यांच्या मदतीने महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळविलेल्या अल्फीयाने आज बालरक्षक टीमची आणि आईवडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गोवासारख्या राज्यांतून स्पर्धा परीक्षेला उतरलेल्या १ लाख ३६ हजार विद्यर्थ्यांमध्ये अल्फीयाने सुवर्णपदक पटकाविले आहे. इतके दिवस शाळाबाह्य राहूनही शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर अल्फीयाने जिद्द आणि मेहनतीने मिळालेल्या संधीचे सोने केले, त्याबद्दल आम्हा बालरक्षकांना तिचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया बालरक्षक रामराव पवार यांनी दिली.
सांताक्रुझच्या एका मोठ्या आणि खाजगी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या अल्फीयाला तिचे शिक्षण चौथीतच अर्धवट सोडावे लागले. मुस्लीम समाजातील असलेल्या अल्फीयाचे वडील तिच्या आईला आणि भावंडांना सोडून गेले. वडील एकाकी घर सोडून गेल्यामुळे दोन मुली आणि घराची जबाबदारी अल्फीयाच्या आईला पेलवणे शक्य झाले नाही. यामुळे अल्फीयाची शाळा सुटली आणि ती शाळाबाह्य झाली.
सहा महिने उलटून गेल्यावरही परिस्थिती बदलली नाही़ आता तिच्या आईला तिला शिकवायची इच्छा असूनही पैशाच्या कमतरतेअभावी चांगल्या शाळेत प्रवेश मिळणे अवघड झाले.

इंग्रजी शाळेत प्रवेश देता आला
रामराव पवार यांनी आपल्या शाळेच्या सहकारी चौधरी मॅडम यांच्यासह अल्फीयाच्या आईची भेट घेतली आणि तिला जवळच्याच पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. अल्फीयाला प्रवेश मिळवून देताना प्रशासनाची असलेली अनास्था दिसून आली़ मात्र बालरक्षक चळवळीच्या यशामुळे तिला प्रवेश मिळवून देणे शक्य झाल्याची प्रतिक्रिया पवार यांनी दिली.

समाधान मिळाले
बालरक्षकांची मोहीम ही मानवतेचे कार्य करत आहे़ अल्फीयाच्या यशाने या चळवळीला आणखी बळकटी मिळत असल्याची प्रतिक्रिया पवार यांनी दिली. अल्फीयाच्या यशामुळे आपण शिक्षणाची इच्छा असलेल्या; पण काही कारणास्तव शाळाबाह्य ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी देत असल्याचे समाधान मिळत असल्याची प्रतिक्रिया मुंबई बालरक्षक चळवळीच्या समन्वयिका वैशाली शिंदे यांनी दिली.

Web Title:  Out of school 'Alfia' made record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.