जागतिक मनुष्यबळाच्या केंद्राकडे आपल्या देशाची वाटचाल; उपराष्ट्रपतींचे गौरवोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 06:01 IST2026-03-22T06:00:35+5:302026-03-22T06:01:58+5:30
‘रतन टाटा कौशल्य’चा दीक्षान्त समारंभ उत्साहात

जागतिक मनुष्यबळाच्या केंद्राकडे आपल्या देशाची वाटचाल; उपराष्ट्रपतींचे गौरवोद्गार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जागतिक मनुष्यबळाच्या केंद्राकडे आपला देश वाटचाल करत आहे, असे गौरोद्गार उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षान्त समारंभप्रसंगी शनिवारी काढले. हा सोहळा लोकभवन मुंबई येथे झाला.
कार्यक्रमाला राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्यांना सुवर्णपदके प्रदान
उपराष्ट्रपती म्हणाले, हा दीक्षान्त समारंभ भारताच्या जागतिक कुशल मनुष्यबळ केंद्र बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यापीठाची पहिली तुकडी म्हणून या विद्यार्थ्यांनी इतिहास रचला आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते विविध कौशल्य अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या स्नातकांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. तसेच लातूर, अहेरी व छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना ‘सर्वोत्तम आयटीआय’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्तीसाठी ‘से नो टू ड्रग’ या मोहिमेचाही शुभारंभही याप्रसंगी करण्यात आला.
‘स्किल इंडिया’त आघाडी
लोकसंख्येला कौशल्याची जोड असेल तरच तो देशाचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश हा तयार होतो. तरुणांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असते. हीच बाब ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्किल इंडिया’ची चळवळ सुरू केली आणि महाराष्ट्राने त्यात आघाडी घेतली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.