Join us
Daily Top 2Weekly Top 5

... इतरांनी श्रेय घेऊ नये, धनंजय मुंढेंच्या 'त्या' दाव्यानंतर पंकजांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 18:47 IST

पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला 10 कोटी 77 लाख रूपयांची थकहमी राज्य सरकारने मंजूर केली आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात श्रेयाची लढाई सुरू झाल्याचे दिसून येते

ठळक मुद्देपंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला 10 कोटी 77 लाख रूपयांची थकहमी राज्य सरकारने मंजूर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात श्रेयाची लढाई सुरू झाल्याचे दिसून येते

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील 32 साखर कारखान्यांना थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे. या 32 कारखान्यांमध्ये परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचाही समावेश आहे. सध्या हा कारखाना माजी मंत्री आणि गोपीनाथ मुंढेंच्या कन्या पंकजा यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे, या कारखान्याला थकबाकी देण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचा दावा धनंजय मुंढेंनी केला असून कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा पलटवार पंकजा यांनी केला आहे.  

पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला 10 कोटी 77 लाख रूपयांची थकहमी राज्य सरकारने मंजूर केली आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात श्रेयाची लढाई सुरू झाल्याचे दिसून येते. वैद्यनाथ साखर कारखान्याला थकहमी मिळण्यासाठी धनंजय मुंडे यांनी विरोध न करता राजकारण बाजूला ठेवून आग्रही मागणी केली असा दावा स्वतः धनंजय मुंडे यांनी केला आहे. तर पंकजा मुंडे यांनी हा दावा खोडून काढत आपल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याचं म्हटलं आहे, यासंदर्भात बीबीसी मराठीने वृत्त दिले आहे. 

कोरोनामुळे संकटात सापडलेल्या कारखानदारीला आधार देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, राज्य सरकारने राज्यातील 32 कारखान्यांसाठी तब्बल 392 कोटी रुपयांची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे. अडचणीत सापडलेल्या 32 साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक म्हणजे 15 साखर कारखाने हे भाजप नेत्यांचे आहेत. या 15 साखर कारखान्यांना 167 कोटी 36 लाखांची थकहमी मिळाली आहे. त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 8, कॉंग्रेसचे 5, शिवसेनेचे 2 आणि अपक्ष नेत्याच्या एका कारखान्यांचा समावेश आहे.

राज्यातील साखर कारखानदारी सुरु होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं पीक कारखान्यात जावे, शेतकऱ्यांच्या मालाला अडचण निर्माण होऊ नये, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयानंतर परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या मदतीवरुन श्रेयवादाचं राजकारण सुरू झालं आहे. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात असल्याने याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आपण सातत्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व साखर संघाकडे पाठपुरावा केल्यामुळेच ही मदत मिळाल्याचं पंकजा यांनी म्हटलंय. तसेच, याप्रकरणी कुणीही श्रेय घेऊ नये, असे म्हणत नाव न घेता धनंजय मुंढेंना टोलाही लगावला आहे.  

टॅग्स :पंकजा मुंडेधनंजय मुंडेसरकारसाखर कारखाने