कोल्हापूरसह राज्यात चार ठिकाणी अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 19:09 IST2025-04-25T19:08:59+5:302025-04-25T19:09:40+5:30

जिवंत अवयवदान प्रक्रिया सुलभ करणार

Organ transplant coordination centers at four places in the state including Kolhapur, Health Minister Prakash Abitkar gave information | कोल्हापूरसह राज्यात चार ठिकाणी अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती

कोल्हापूरसह राज्यात चार ठिकाणी अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली माहिती

मुंबई : अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक रुग्णालय नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि तत्काळ करतानाच विभागीय प्राधिकरण समित्यांकडून जिवंत अवयवदान परवानगी प्रक्रियेला सुलभ केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्रीप्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी येथे दिली. राज्यात नाशिकसह अमरावती, कोल्हापूर आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य भवन येथे अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी अवयव प्रत्यारोपण केंद्राबाबत माहिती दिली. अवयवदानासाठी जनजागृती, सन्मान आणि सामाजिक सहभाग असल्याने राज्यभर जनजागृती मोहीम राबवून जनतेत अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यानुसार १ मे या महाराष्ट्र दिनी, जिल्हास्तरावर अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टर आणि समन्वयकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातील. तसेच ‘फेलोशिप इन क्रिटिकल मेडिसीन’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तत्काळ सुरू केला जात असल्याची माहिती आबिटकर यांनी यावेळी दिली.

शासकीय रुग्णालयांमध्ये मानवी अवयव पुनर्प्राप्ती केंद्रांची निर्मिती आणि त्या ठिकाणी समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे प्रकाश आबिटकर यावेळी म्हणाले. या बैठकीला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिकारी मानवी अवयव प्रत्यारोपण तसेच विधी आणि न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कामगार विमा रुग्णालये होणार अत्याधुनिक

दरम्यान, राज्यातील कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा आणि यंत्रसामग्री आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आबिटकर यांनी अन्य एका बैठकीत दिले. राज्यातील रेशन दुकानदार, पतसंस्था आणि शिक्षक यांनाही कामगार विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

तसेच रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढवण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी शिबिरे आयोजित करावीत आणि सुविधा वाढवण्याचे प्रयत्न करावेत. याचबरोबर रुग्णालयांचा दर्जा वाढविण्यासाठी नवीन योजना तयार कराव्यात. त्यासाठी राज्य सरकारकडून साहित्य आणि यंत्रसामग्री पुरवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल तसेच डायलिसिससारख्या आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, असेही प्रकाश आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Organ transplant coordination centers at four places in the state including Kolhapur, Health Minister Prakash Abitkar gave information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.