Join us

शपथविधी समारंभाला विरोधकांची पाठ, राजकीय कटुता कायमच; काहींना फोनवर विनंती, काहींना पाठविले निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 05:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे यांना स्वतः फोन करून शपथविधी समारंभाचे निमंत्रण दिले होते.

मुंबई : निवडणुकीबरोबर राजकीय कटुता संपते म्हणतात; पण देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ राजकारणातील दाखविल्याने कटुता निवडणुकीनंतरही कायम असल्याचे दिसले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे यांना स्वतः फोन करून शपथविधी समारंभाचे निमंत्रण दिले होते. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही आझाद मैदानावरील समारंभासाठी गेले नाही. २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध कमालीचे ताणले गेले होते. तरीही २०१९ ला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला भाजपकडून देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील उपस्थित होते. 

  सोहळ्यात उपस्थित मविआच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत या दोघांबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजीही केली होती. तरीही हे दोघे ठाकरेंचा शपथविधी सोहळा पूर्ण होईपर्यंत थांबले होते. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या शपथविधीला विरोधक हजर राहणार का याकडे लक्ष लागले होते. फडणवीस यांनी स्वतः विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना फोन करून उपस्थित राहण्याची विनंती केली होती. तर काही नेत्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली होती.

...तर नक्कीच गेलो असतो : नाना पटोले 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की आपल्याला शपथविधी समारंभाचे निमंत्रण मिळालेले नव्हते. ते मिळाले असते तर नक्कीच गेलो असतो.

सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यासारखे चित्र 

■ शरद पवार संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत होते. पवार आणि राज ठाकरे यांनी आपण इतर कामात व्यस्त असल्याने या सोहळ्याला येणार नसल्याचे कळवले होते. तर उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे राज्यात असूनही सोहळ्याला आले नाहीत. विरोधी पक्षातील इतर निमंत्रितही उपस्थित नव्हते. विरोधी पक्षांतर्फे कुणी प्रतिनिधीही या सोहळ्याला हजर नव्हते. त्यामुळे विरोधकांनी बहिष्कार टाकल्यासारखे चित्र दिसले.

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेसभाजपा