Opinion Poll: 'छत्तीसचा आकडा' भाजपा-सेनेला लाभणार, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 21:49 IST2018-10-04T21:47:40+5:302018-10-04T21:49:37+5:30
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना-स्वाभिमानी युतीनं महाराष्ट्रातील ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांना चाळीशी पार करता येणार नाही.

Opinion Poll: 'छत्तीसचा आकडा' भाजपा-सेनेला लाभणार, पण...
मुंबईः केंद्र आणि राज्यातील सत्तेत भाजपा-शिवसेना हे जुने मित्र एकत्र असले तरी त्यांच्यातील छत्तीसचा आकडा सगळ्यांनाच ठाऊक आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे, मतभेद आणि मनभेद विसरून हे दोन पक्ष लोकसभेची निवडणूक एकत्र लढल्यास ते महाराष्ट्रातील ४८ पैकी ३६ जागा जिंकू शकतात, असं एबीपी वृत्तसमूह आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला १२ जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते, असं आत्ताचं चित्र आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यापासून भाजपा-शिवसेनेतील दरी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा किंवा इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. परंतु, भाजपा या जुन्या मित्राला खूश करण्याचा, गोंजारण्याचा प्रयत्न करतेय. त्यात ते यशस्वी झाल्यास महाराष्ट्रात युतीला मोठा फायदा होईल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसू शकेल, असे आकडे सर्वेक्षणातून समोर आलेत.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना-स्वाभिमानी युतीनं महाराष्ट्रातील ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपाचे २३, शिवसेनेचे १८ आणि स्वाभिमानी पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला होता. यावेळी भाजपा-सेना युती झाली तर त्यांना चाळीशी पार करता येणार नाही, पण ते ३६ जागा जिंकू शकतात.
दुसरीकडे, भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी हातावर घड्याळ बांधूनच मैदानात उतरतील, असं चित्र आहे. ही आघाडी झाली तरी त्यांची मजल १२ जागांपर्यंतच जाईल, असं आत्ताचा कल दिसतो. अर्थात, काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी हे दुप्पट यश असेल. कारण, २०१४च्या निवडणुकीत त्यांनी षटकार ठोकला होता. राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेसचे दोन जण विजयी झाले होते.
दरम्यान, येत्या काळात महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडी, उलथापालथी घडण्याची शक्यता असल्यानं समीकरणं कशीही बदलू शकतात.