आॅपरेशन ‘मुस्कान’ सुसाट
By Admin | Updated: July 16, 2015 04:55 IST2015-07-16T04:55:52+5:302015-07-16T04:55:52+5:30
रेल्वे स्थानकांवर हरवलेल्या बालकांच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी-गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) १ जुलैपासून सुरू केलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’ या विशेष मोहिमेत रेल्वे

आॅपरेशन ‘मुस्कान’ सुसाट
- सुशांत मोरे, मुंबई
रेल्वे स्थानकांवर हरवलेल्या बालकांच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी-गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) १ जुलैपासून सुरू केलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’ या विशेष मोहिमेत रेल्वे पोलिसांनी अवघ्या १२ दिवसांत तब्बल ४९२ मुला-मुलींचा शोध लावला आहे. रेल्वे पोलीस एक महिना ही मोहीम राबवणार असल्याने येत्या काही दिवसांत त्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई लोकल मार्गावर दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करीत असून, त्याशिवाय लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून उपनगरीय स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. या प्रवासात अनेकदा गर्दीत लहान मुले हरवतात आणि त्यांचा शोध पालकांना लागत नाही. यासाठी रेल्वे पोलिसांकडे तक्रार करून त्यांची मदत घेतली जाते आणि हरवलेली बालके अथक शोधमोहिमेनंतर पालकांच्या हवाली केली जातात.
तरीही पालकांपासून दुरावलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी केंद्राच्या गृह मंत्रालयाने एक विशेष मोहीम एक महिनाभर राबवण्याचा निर्णय घेत तशा सूचनाच देशभरातील रेल्वे पोलिसांना केल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार १ जुलैपासून ‘आॅपरेशन मुस्कान’ मोहीम रेल्वे पोलिसांकडून सुरू करण्यात आली असून, ३१ जुलैपर्यंत ती सुरूठेवली जाणार आहे. या मोहिमेत आतापर्यंत ४९२ मुला-मुलींचा शोध घेतला आहे. तर ४२१ मुला-मुलींना पालकांच्या ताब्यात दिले तर ७१ जणांना बालसुधारगृहात ठेवण्यात आल आहे. गेल्या १२ दिवसांतील कामगिरी पाहता स्थानकांवर दररोज हरवलेली जवळपास ३0 ते ५0 मुले-मुली सापडत आहेत.
या ‘आॅपरेशन मुस्कान’मध्ये पाच वर्षांत हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र यात २४ तासांत तसेच दोन ते तीन दिवसांत हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यात आला आहे. पाच वर्षांत हरवलेली मुले-मुली नसल्याचे सांगण्यात आले.
18वयोगटापर्यंतची सापडलेली मुले-मुली ही आहेत.
या शोधमोहिमेसाठी सर्व रेल्वे पोलीस ठाण्यांतील बाल पोलीस पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या मोहिमेत फलाटांवरील विविध ठिकाणी काम करीत असलेल्या आणि राहत असलेल्या विनापालक बालकांचा आणि हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात देण्यात येत आहे.
सापडलेली बहुतांश मुले ही महाराष्ट्रातीलच आहेत. मुंबईचे आकर्षण, मुंबईत धावणाऱ्या लोकलचे आकर्षण, चित्रपटातील कलाकारांवर असलेले प्रेम, गरिबीला कंटाळलेली तसेच आई-वडील रागावल्याने घर सोडलेल्या मुला-मुलींचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे पालकांसोबत मुंबईतील रेल्वे स्थानकांवर आल्यानंतर गर्दीत हरवलेली मुले-मुली यात असल्याचे सांगण्यात आले.
आॅपरेशन मुस्कानमध्ये रेल्वे पोलिसांकडून चांगली कामगिरी होत आहे. यासाठी विशेष पथकावरही कामगिरी सोपवण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या रेल्वे पोलीस ठाण्याला बक्षीसही देण्याचा निर्णय घेतला आहे.
- मधुकर पाण्डेय (पोलीस आयुक्त, लोहमार्ग)
बारा दिवसांतच ४९२ मुले-मुली सापडली असून, यातील बऱ्याच जणांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याचे प्रमाण अधिक आहे. रेल्वे पोलिसांकडून ही कामगिरी उत्तम झाली आहे.
- एम. आर. दिघे (पोलीस निरीक्षक-महिला
व बाल कक्ष, लोहमार्ग)-