‘ऑपरेशन सिंदूर’मुळे माता, भगिनींची मान गर्वाने उंच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 06:32 IST2025-05-28T06:31:37+5:302025-05-28T06:32:02+5:30
सिंदूरचे महत्त्व संपूर्ण जगाला कळले : अमित शाह यांचे उद्गार

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे माता, भगिनींची मान गर्वाने उंच
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षांच्या कार्यकाळात प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक वर्षे प्रलंबित असलेले ऐतिहासिक निर्णय घेतले. जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास आला आहे. बदललेल्या भारताने माता, भगिनींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांना घरात घुसून मारले. ऑपरेशन सिंदूरमुळे आपल्या माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली असून, संपूर्ण जगाला ‘सिंदूर’ शब्दाचा अर्थ, त्याचे महत्त्व समजले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केले.
माधवबाग येथील प्रसिद्ध श्रीलक्ष्मी नारायण मंदिराच्या १५०व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात शाह बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, माधवबाग चॅरिटी ट्रस्टचे विश्वस्त महेश शाह, जतीन पारीख, भरत शाह आदी यावेळी उपस्थित होते.
शाह म्हणाले, “इंग्रजांच्या काळात १८७५मध्ये मुंबईच्या मध्यभागात माधवबाग धार्मिक केंद्र उभे राहिले. समाजाबद्दलची उद्दात भावना लक्षात घेऊन सुचिता, संतुलन आणि सत्कर्म या त्रिवेणीमधून माधवबाग ट्रस्ट बनले. दीडशे वर्षे ही संस्था समाजसेवेचे कार्य अविरतपणे करीत आहे. जेव्हा संस्था २०० वर्ष पूर्ण करेल त्यावेळी येथे आपल्या मातृभाषेचे प्रशिक्षण केंद्र असावे. गीता, उपनिषदं आणि वेदांचे शिक्षण येथे मिळावे. मध्यमवर्गीय समाजाचा विचार करणारे हे धार्मिक केंद्र व्हावे. लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी.”
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “माधवबाग लक्ष्मी नारायण मंदिराच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाली हा अतिशय महत्त्वपूर्ण क्षण आहे. या वास्तूमध्ये फक्त देवाची मूर्ती नसून येथे त्याचे प्रत्यक्ष वास्तव्य आहे. त्यामुळेच गोसेवा, समाजसेवा यांसह अन्य प्रकारच्या मदत कार्यासाठी नेहमीच माधवबाग ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.
माझ्या तीन बहिणींची लग्ने येथेच झाली
माझा जन्म मुंबईत झाला. लहानपणी अनेकवेळा याच मंदिरात आरती, देवदर्शनासाठी आलो. येथील वास्तू शिल्प अद्भुत असून, मूर्तीच्या चेहऱ्यावर मूर्तिकाराने अत्यंत सुंदर भाव जपले आहेत.
इथे एका छोट्या हॉलमध्ये शेकडो मध्यमवर्गीय कुटुंबांची लग्ने झाली आहेत. माझ्या तीन बहिणींची लग्ने याच माधवबागेत झाली, अशी आठवण अमित शाह यांनी सांगितली.