दहशतवाद्यांविरोधातील भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन सिंदूर' हे यशस्वी ठरलं. या ऑपरेशनची माहिती देशभरात पोहोचवण्यासाठी भाजपाकडून तिरंगा यात्रा काढली जात आहे. १३ मे ते २३ मे या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात तिरंगा यात्रेचं आयोजन केलं जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपाने मुंबईतही भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ ऑगस्ट क्रांती मैदान ते स्वराज्य भूमी, गिरगाव चौपाटी येथे तिरंगा यात्रा काढली. या यात्रेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे अनेक नेते आणि हजारो मुंबईकर सहभागी झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी "सुन ले बेटा पाकिस्तान, बाप हे तेरा हिंदुस्तान" असं म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला" असं म्हणत भारतीय सैन्याचं कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. "तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आम्ही आमच्या सैन्याचे आभार मानण्यासाठी एकत्र जमलो आहोत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आम्हाला कोणीच झुकवू शकत नाही, आम्ही झुकणार नाही, थांबणार नाही, थकणार नाही हे सैन्याने दाखवून दिलं. भारतीय सैन्याची ताकद ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दाखवून दिली."
"पहलगाममध्ये धर्म विचारून लोकांना मारण्यात आलं, कुटुंबीयांसमोर मारण्यात आलं... असं हत्याकांड जगाच्या इतिहासात पाहायला मिळालं नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हे लाँच केलं. बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम दहशतवाद्यांनी केलं, त्यांना नेस्तनाबूत करण्याकरता ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली. पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्धवस्त केले. मला सर्वात जास्त आनंद कशाचा असेल तर ज्या ठिकाणी कसाबने प्रशिक्षण घेतलं तो अड्डा देखील नेस्तनाबूत करण्यात आला. मुंबईच्या अपराध्यांना ठोकण्याचं काम सैन्याने केलं."
" तुम्ही कुठेही गेलात तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, घुसून मारू हे भारतीय सैन्याने दाखवून दिलं"
"पाकिस्तानमध्ये जिथे दहशतवाद्यांसाठी सेफ हाऊस तयार केलं होतं तिथेच भारतीय सैन्याने जाऊ त्यांना ठोकलं. सर्व अड्डे उद्ध्वस्त केले. तुम्ही कुठेही गेलात तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, घुसून मारू हे भारतीय सैन्याने दाखवून दिलं. पाकिस्तानचा एकही हल्ला यशस्वी होऊ शकला नाही याचा मला अभिमान आहे. पाकिस्तानला युद्धबंदी करायची असेल तर त्यांनी आमच्यासमोर गुडघे टेकावेत असं भारताने सांगितलं. सैन्य अधिकाऱ्यांनी फोन करून आम्हाला विनंती करावी तरच आम्ही युद्धबंदी करू असं सांगितलं. विनंती केल्यानंतर ही युद्धबंदी झाली. भारतीय सैन्याची ताकद जगाला पाहायला मिळाली. भारतीय सैन्य अभेद्य आहे. सैन्याच्या शौर्याच्या सन्मानासाठी, भारताची ताकद जगाला दाखवण्यासाठी ही तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.