महाराष्ट्रात दोनच नेते राहतील अन् बारामतीचं मैदान शरद पवारच मारतील- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 01:01 PM2023-11-15T13:01:54+5:302023-11-15T13:04:59+5:30

शरद पवार हे अजित पवार गटाला २०२४ च्या निवडणुकीत माती चारतील असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

Only two leaders will remain in Maharashtra and only Sharad Pawar will win Baramati says Sanjay Raut | महाराष्ट्रात दोनच नेते राहतील अन् बारामतीचं मैदान शरद पवारच मारतील- संजय राऊत

महाराष्ट्रात दोनच नेते राहतील अन् बारामतीचं मैदान शरद पवारच मारतील- संजय राऊत

मुंबई-

शरद पवार हे अजित पवार गटाला २०२४ च्या निवडणुकीत माती चारतील असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. कुणी कितीही निष्ठेच्या गप्पा मारत असलं तरी खरी निष्ठा काय असते ते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे खंदे कार्यकर्ते दाखवून देतील. महाराष्ट्राच्या राजकारणात २०२४ नंतर दोनच चेहरे राहतील. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे उद्धव ठाकरे, असं संजय राऊत म्हणाले. 

"आज शरद पवार संकटाला सामोरं जात खंबीर उभे राहत आहेत. बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीत. पण त्यांच्या विचारांची मशाल उद्धव ठाकरे समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत. २०२४ च्या निवडणुकीनंतर हेच दोन चेहरे महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतील. आज अजित पवार आणि शरद पवार कितीही एकत्र दिसत असले तरी काही कौटुंबिक गोष्टी असतात. संस्थात्मक गोष्टी असतात. त्या आम्हाला माहित आहेत. निवडणुकीत शरद पवार अजित पवार गटाला माती चारतील. बारामतीच्या कुस्तीतही शरद पवारच मैदान मारतील", असं संजय राऊत म्हणाले. 

राजकारणामध्ये निष्ठेला महत्त्व
"महाराष्ट्राला मराठी माणसाला सामान्यांना स्वातंत्र्य राहण्याचा मंत्र दिला त्या पक्षाशी निष्ठा ठेवणे हे महाराष्ट्रावर निष्ठा ठेवण्यासारखी आहे असं मी मानतो. त्यामुळे सत्ता येते, सत्ता जाते पण संकट आलं म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही", असंही राऊतांनी म्हटलं आहे. आज संजय राऊत यांचा वाढदिवस असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, राऊतांनी सुषमा अंधारेंचं कौतुक केलं आहे. अंधारे यांनी राऊतांना पत्र लिहून वाढदिवस आणि भाऊबीजेच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Only two leaders will remain in Maharashtra and only Sharad Pawar will win Baramati says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.