'म्हाडा'च्या नाशिक व औरंगाबाद मंडळ सदनिका सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 05:09 PM2019-02-27T17:09:29+5:302019-02-27T17:09:41+5:30

औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या ९१७ सदनिकांच्या विक्री सोडतीसाठी अर्जदारांची नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणे या प्रक्रियेचा शुभारंभ 'म्हाडा'चे माननीय अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आला.

 Online registration for registration of Nashik and Aurangabad boards for the vacancy of MHADA started | 'म्हाडा'च्या नाशिक व औरंगाबाद मंडळ सदनिका सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला प्रारंभ

'म्हाडा'च्या नाशिक व औरंगाबाद मंडळ सदनिका सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला प्रारंभ

Next

मुंबई :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या ११३३ व व औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या ९१७ सदनिकांच्या विक्री सोडतीसाठी अर्जदारांची नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणे या प्रक्रियेचा शुभारंभ 'म्हाडा'चे माननीय अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आला.

नाशिक व औरंगाबाद मंडळाच्या कार्यालयात झालेल्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात हा शुभारंभ करण्यात आला. नाशिक मंडळातर्फे सोडतीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सॊडत ०३ एप्रिल, २०१९ रोजी सकाळी दहा वाजता नाशिकमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात काढण्यात येणार आहे. औरंगाबाद मंडळातर्फे सोडतीकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत ०४ एप्रिल, २०१९ रोजी सकाळी दहा वाजता औरंगाबादमधील तापडिया नाट्य मंदिर येथे काढण्यात येणार आहे.

सामंत म्हणाले की,  म्हाडाची संगणकीय सोडत संपूर्णपणे पारदर्शक आहे. या सोडतीच्या निमित्ताने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेऊन गृहस्वप्नपूर्ती करावी. नाशिक व औरंगाबाद मंडळांतर्गत उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या संगणकीय सोडतींकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.inया अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. दोन्ही मंडळांच्या सोडतीकरिता उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली असून एक युजर आय डी वापरून अर्जदार एका पेक्षा जास्त सदनिकांसाठी अर्ज करू शकतो, अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली.

नाशिक मंडळाच्या सोडतीकरिता अर्जदारांची नोंदणी २७ फेब्रुवारी, २०१९ दुपारी दोन वाजेपासून २२ मार्च, २०१९ रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत केली जाणार असून याच कालावधीत नोंदणीकृत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना २७ फेब्रुवारी, २०१९ ते २४ मार्च, २०१९ या कालावधीत एनईएफटी / आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. २७ फेब्रुवारी, २०१९ दुपारी २ वाजेपासून दि. २४ मार्च, २०१९ रात्री ११.५९ वाजेपर्यंत डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. नाशिक मंडळाच्या सोडतीत आडगाव-म्हसरूळ लिंक रोड (नाशिक), श्रीरामपूर (जि. अहमदनगर), पंचक (नाशिक), डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजजवळ आडगाव (नाशिक), जी. डी. सावंत कॉलेज समोर, पाथर्डी शिवार (नाशिक), साईबाबा मंदिराजवळ, पाथर्डी शिवार (नाशिक), मखमलाबाद (नाशिक), चाळीसगाव रोड-धुळे येथील सदनिकांचा समावेश आहे.

औरंगाबाद मंडळाच्या सोडतीकरिता अर्जदारांची नोंदणी दि. २७ फेब्रुवारी, २०१९ दुपारी बारा वाजेपासून २७ मार्च, २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना अर्ज सादर करण्यासाठी २८ फेब्रुवारी, २०१९ रोजी दुपारी १२ वाजेपासून ते २७ मार्च, २०१९ रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोंदणीकृत अर्जदारांना २८ फेब्रुवारी, २०१९ ते २८ मार्च, २०१९ या कालावधीत एनईएफटी / आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. २८ फेब्रुवारी, २०१९ दुपारी १२ वाजेपासून दि. २७ मार्च, २०१९ रात्री ११.५९ वाजेपर्यंत डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. औरंगाबाद मंडळाच्या यंदाच्या सोडतीत देवळाई (औरंगाबाद), एमआयडीसी पैठण, एमआयडीसी वाळूज, तिसगाव येथील सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमाला औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, नाशिक/औरंगाबादचे मुख्य अधिकारी रमेश मिसाळ, वित्त नियंत्रक विकास देसाई, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके आदींसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास नाशिक व औरंगाबाद मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन 'म्हाडा'तर्फे करण्यात आले आहे.

Web Title:  Online registration for registration of Nashik and Aurangabad boards for the vacancy of MHADA started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा