कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी, १० दिवसांत भाव निम्म्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 06:43 IST2024-12-24T06:43:03+5:302024-12-24T06:43:10+5:30
कोट्यवधींचे नुकसान; २० टक्के निर्यात शुल्क हटविण्याची मागणी

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी, १० दिवसांत भाव निम्म्यावर
योगेश बिडवई
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले कांद्याचे दर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरायला सुरुवात झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १० दिवसांत सर्वसाधारण भाव ३६ रुपये प्रति किलोवरून सोमवारी थेट निम्म्यावर म्हणजे १७ रुपये २५ पैशांवर आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.
लासलगाव बाजार समितीत काही दिवसांपासून रोज २५ हजार क्विंटल आवक सुरू आहे. सोमवारी कांद्याला क्विंटलला कमीत कमी ७००, तर जास्तीत जास्त २,८५१ रुपये दर मिळाला. १२ डिसेंबरला कांद्याला क्विंटलमागे जास्तीत जास्त ५,००१ रुपये दर मिळाला हाेता. सोमवारी २,८५१ रुपये दर मिळाला.
काही दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने सकाळ, संध्याकाळ कीटकनाशक फवारावे लागत आहे. खतांवरही अतिरिक्त खर्च वाढला आहे. मात्र, त्यावर कोणीही बोलत नसल्याचा संताप वाहेगाव साळचे (ता. चांदवड, जि. नाशिक) कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी व्यक्त केला.
कांदा दरात घसरण
तारीख दर
१२ डिसेंबर ३,६००
१३ डिसेंबर ३,२००
१४ डिसेंबर २,७००
१६ डिसेंबर २,३५१
१७ डिसेंबर २,१००
१८ डिसेंबर १,९००
१९ डिसेंबर १,९००
२० डिसेंबर २,०००
२१ डिसेंबर २,०००
२३ डिसेंबर १,७२५
नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा आता बाजारात येत आहे. त्यातच बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे १० दिवसांत कांदा दरात निम्म्यापेक्षा जास्त घसरण झाली आहे. सरकारने २० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे - नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती