Omicron: BMCचा मोठा निर्णय, 1 डिसेंबरपासून मुंबईत पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 11:33 IST2021-11-30T10:37:33+5:302021-11-30T11:33:21+5:30

कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पहिली ते चौथीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Omicron News: Big decision of BMC, 1st to 4th classes will not start from 1st December | Omicron: BMCचा मोठा निर्णय, 1 डिसेंबरपासून मुंबईत पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार नाहीत

Omicron: BMCचा मोठा निर्णय, 1 डिसेंबरपासून मुंबईत पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार नाहीत

मुंबई: राज्य सरकारने उद्या म्हणजेच 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन नव्या व्हेरिएंटमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC ) पहिली ते चौथीचे वर्ग तुर्तास सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत झालेल्या बैठकीत पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं पहिली ते चौथीचे वर्गा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने पहिली ते चौथीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण आयुक्त राजू तडवी यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या निर्णयाच्या आधारे प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार नसून, येत्या दहा-बारा दिवसांमध्ये यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्य सरकारचा निर्णय 
मागच्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासदंर्भात माहिती दिली होती. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने सोमवारी शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे शाळा 1 डिसेंबरपासून सुरु होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

शाळा 1 डिसेंबरलाच सुरू होणार-राजेश टोपे
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील शाळेसंदर्भात महत्वाची माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते, ओमायक्रॉनसंदर्भात अजून तरी आपल्या राज्याला कुठलिही भीती नाही. सध्या चिंता बाळगण्याची गरज नाही. पण, दक्षिण आफ्रिकेती त्याचा रिफ्लेक्ट झालेला प्रभाव लक्षात घेता, काळजी घ्यायला हवी म्हणून मुख्यमंत्र्यांसमेवत आरोग्य विभाग आणि टास्क फोर्सची बैठक झाली. त्यानुसार, 1 डिसेंबरला ठरल्याप्रमाणे शाळा सुरू होतील, असेही राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले.

जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचना
राज्यभरातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा संचालनालयाकडून जिल्हापरिषद, महापालिका, नगरपालिका स्तरावर या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यात दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूट अंतर, शाळेत मास्क घालणे बंधनकारक, वैयक्तिक आणि शाळेत स्वच्छता, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू नये, शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Web Title: Omicron News: Big decision of BMC, 1st to 4th classes will not start from 1st December