Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 20:19 IST

Laxman Hake : मराठा आरक्षणासाठी काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण सुरू केलं आहे.

Laxman Hake ( Marathi News ) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काही आंदोलनही सुरू केलं आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली असून ओबीसी नेत्यांनी या आरक्षणाला विरोध सुरू केलाय. दरम्यान, आज काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. या भेटीवरुन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली. 

"आज या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अशोकराव चव्हाण यांनी दोन ते तीन वेळा भेट घेतली. माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार हे पण भेटले. आताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेड कारपेटच टाकतात. पण या चारही मुख्यमंत्र्यांना राज्यात सामाजिकदृष्ट्या मागास, बारा बलुतेदार राहतात याचं थोडसुद्धा सोयर सुतक नसावं,अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. 

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं?

"आता या चार मुख्यमंत्र्यांची नाव घेतली, हे मंत्री ओबीसीच्या आरक्षणावर बोलायला तयार नाहीत. यांना फक्त जरांगेंच्या मतांची काळजी पडली. पण, ओबीसी बांधवांच्या मतांचे काही पडलेले नाही, असंही लक्ष्मण हाके म्हणाले. ओबीसी, भटक्या विमुक्त जातीच्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, हे सगळे आजी माजी मुख्यमंत्री पक्षसोडून एक आहेत. ही माणस २०२४ च्या निवडणुकीनंतर येनकेन प्रकारे ओबीसींचं आरक्षण संपवणार आहेत, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला. 

"याचं ऑडिट आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत करावं लागेल, कारण या माणसांना फक्त निवडणुका, पक्ष, आपला आमदार कसा जिंकेल एवढच महत्वाच आहे. हे लोक जरांगेंना पत्र देतात. पण ओबीसी समाजाला विचारायलाही तयार नाही, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.  

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी महायुतीविरोधात उघड भूमिका घेत अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार पाडण्याचं आवाहन केलं होतं. जरांगे पाटील यांच्या या आवाहनाचा मराठवाड्यात मोठा परिणाम दिसून आला. मराठवाड्यातील आठ जागांपैकी सात जागांवर महायुतीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. मात्र आता जरांगे यांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्याने महायुतीसह महाविकास आघाडीच्या गोटातही अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेली जरांगे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

टॅग्स :लक्ष्मण हाकेमनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणपृथ्वीराज चव्हाण