Coronavirus: राज्यात कोरोना बाधितांची संख्या १८६; २६ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 06:24 IST2020-03-29T01:46:02+5:302020-03-29T06:24:52+5:30
राज्यात आज एकूण ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.

Coronavirus: राज्यात कोरोना बाधितांची संख्या १८६; २६ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
मुंबई : राज्यात शनिवारी आणखी ३३ कोरोना (कोविड-१९) रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १८६ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे, पुण्याचे ४, जळगावचा १, तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत. पालघर - वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील चार रुग्ण आहेत. सध्या बधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
राज्यात आज एकूण ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १८६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत २६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७,२९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५९२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.