Join us  

एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 9:25 AM

उद्धव ठाकरे यांनी सीएएचे समर्थन केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए हा नागरिकत्व देणार कायदा असल्याचे सांगितले आहे.

ठळक मुद्देसामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी, भाजपासोबत पुन्हा जाण्याची शक्यता यावर मत मांडले आहे.ठाकरे यांनी एनआरसी हा धोकादायक कायदा असल्याचे म्हटले आहे.

 मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी हे कायदे महाराष्ट्रात लागू होऊ देणार नसल्याचे म्हटले होते. यावरून भाजपाने राज्य बरखास्त होण्याचा इशाराही दिला होता. मात्र, आज उद्धव ठाकरे यांनी सीएएचे समर्थन केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए हा नागरिकत्व देणार कायदा असल्याचे सांगितले आहे. ‘सीएए’बाबत किती गैरसमज आहेत ते आधी दूर करायला हवेत. ‘सीएए’ हा देशातील कोणालाही बाहेर काढण्याचा कायदा नाहीय, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यातील तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रकाशित झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी, भाजपासोबत पुन्हा जाण्याची शक्यता यावर मत मांडले आहे. ठाकरे यांनी एनआरसी हा धोकादायक कायदा असल्याचे म्हटले आहे. यामध्ये मुसलमानच नाहीत तर 40 टक्के हिंदूही भरडले जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

सीएए हा कुणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही. अमित शहांनी म्हटलंय की, हा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. तेवढय़ापुरतं मी मानतो. आपल्या शेजारील देशांतील पीडितांना इथे नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे. इथून कुणालाही बाहेर घालवण्याचा कायदा नाही. आणखी एक गोष्ट आहे ज्याची चर्चा होणार नाही, किंबहुना होत नाहीय, ती आहे एनआरसी. एनआरसी केवळ मुसलमानांना त्रासदायक आहे असं नाहीय. मुळात एनआरसी येणार नाही. किंबहुना आम्ही तो येऊच देणार नाही. एनआरसी अमलात आणण्याचं जर भाजपने ठरवलं तर केवळ मुसलमानांनाच त्रास होणार नाही, तर तुम्हा-आम्हाला आणि देशातल्या हिंदूंना तसेच सर्व धर्मांना त्रास होणार आहे. म्हणजे तिथे त्याबाबतीत तरी सर्वधर्म समभाव येणार आहे, असा खोचक टोलाही ठाकरे यांनी लगावला. यानंतर भाजपाला त्यांनी इशारा दिला. 

मी ‘एनआरसी’ला विरोध केला म्हणजे मी राष्ट्रद्रोही आणि तुम्ही पाठिंबा दिलात म्हणजे तुम्ही देशभक्त असं नाही. अरे बाबा, ते ‘एनआरसी’ आले की तुम्हालाही नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी त्या लायनीत उभं राहावं लागणार आहे. तुमचेही आईवडील किंवा कुटुंबीय असतील त्यांनासुद्धा हे भोगावं लागणार आहे, असा इशारा ठाकरे यांनी भाजपच्या नेते , कार्यकर्त्यांना दिला.  

यानंतर त्यांनी आदिवासींचा प्रश्न उपस्थित केला. आदिवासींचं काय होणार? जंगल-दऱयाखोऱयातले आदिवासी कोठून आणणार जन्माचे पुरावे? सांगा जरा. आदिवासींना हे कळेल तेव्हा आदिवासीही प्रचंड संख्येनं रस्त्यावर येतील. त्यांच्याकडे नागरिकत्वाचा दाखला मागितला तर हे होणारच आहे. हिंदूंनासुद्धा हे भोगावं लागणार आहे. या देशात बहुसंख्य हिंदू आहेत आणि एनआरसीचा सगळय़ात जास्त त्रास हिंदूंनाच होणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

केवळ एनआरसीसाठी सर्वधर्म समभाव असेल...

सगळय़ा नागरिकांना आपलं नागरिकत्व सिद्ध करावं लागणार. म्हणून हा हिंदू-मुसलमान भेद तिकडे येणार नाही. मुसलमानांनी आंदोलन केले, ते रस्त्यांवर आले. हीच भूमिका हिंदूंनी घेतली तर काय कराल? एनआरसी हिंदूंच्या सुद्धा मुळावर येणार आहे. जसं आसाममध्ये झालं. आसामचा विचार केला तर तिथे हा महत्त्वाचा कायदा आहे. आसाममध्ये 19 लाख लोकांना आपलं नागरिकत्व सिद्ध करता आलेलं नाही. म्हणून याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आणि या 19 लाखांत 14 लाख हे हिंदू आहेत. तिथल्या आमदार, खासदारांचे म्हणजेच लोकप्रतिनिधींचेही कुटुंबीय त्यामध्ये आहेत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट करत एनआरसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेसंजय राऊतशिवसेनाभाजपाअमित शहानागरिकत्व सुधारणा विधेयकएनआरसी