Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता गेंडेच त्यांच्या पिल्लांना म्हणत असतील की..; उद्धव ठाकरेंनी दिलं उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 10:07 IST

उद्धव ठाकरेंनी सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यासोबत पॉडकास्ट सदरमध्ये सहभाग घेतला

मुंबई - राज्यात आणि देशात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी खंत व्यक्त केली. ज्या पद्धतीने राजकीय कुरघोड्या, पक्ष फोडाफोड्या सुरू आहेत, ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि वारसा नाही. ईर्शाळवाडीत मोठी दुर्घटना घडली असताना मुख्यमंत्री तातडीने दिल्लीवारी करतात, दिल्लीत मुजरा मारायला जातात. इर्शाळवाडीत एकीकडे मृतदेह बाजुला काढायचे काम सुरू असताना हे दिल्लीत जाऊन काय करतात, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. 

उद्धव ठाकरेंनी सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यासोबत पॉडकास्ट सदरमध्ये सहभाग घेतला. यावेळी, राज्यातील आणि देशातील राजकारणावर भाष्य केलं. तसेच, शिवसेनेतील फूट आणि महायुती सरकावरही ते बोलले. यावेळी, सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल आणि राजकारण्यांबद्दल बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली. 

राज्यात ईर्शाळवाडीची दुर्घटना घडली असताना मुख्यमंत्री दिल्लीत जातात, तिकडे मणीपूरमधील महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात येते, या घटनेवरुन देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जातो. मे महिन्यात घडलेली ही घटना आत्ता व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली. तशीच आणखी एक घटना तिकडे घडली. पण, तरीही पंतप्रधान तिकडे जायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ताकीद दिल्यानंतर फक्त ३० ते ३५ सेकंदाचं ते काहीतरी बोलले आणि राजस्थानला प्रचारासाठी निघून गेले, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

राजकारणाची संवेदना, भावना मेल्यात असं वाटतं का आपल्याला? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर, पूर्वी असं म्हटलं जायचं की राजकारणाची कातडी ही गेंड्याची कातडी आहे. आता, कदाचित गेंडे असं म्हणत असतील की, अरे तुझी कातडी राजकारण्यांची कातडी झालीय, असे उदाहरण देत उद्धव ठाकरेंनी सध्याच्या राजकारणातील खंत बोलून दाखवली. तसेच, गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय, असेही ते म्हणाले. 

लोकशाही साधा माणूस वाचवणार

हा देश प्रत्येकाचा आहे. त्यानेच आता धैर्याने उभं राहायला हवं. हे सरकार कुणाचे आहे तर हे सरकार माझे आहे. त्या सामान्य माणसाचे आहे. त्या सामान्य माणसाच्या मतांवर हे सरकार निवडून आले आहे. त्या सामान्य माणसाने आता विचार करून मत दिले पाहिजे. कारण तो नुसते मत देत नाही तर तो त्याचं आयुष्य यांच्या हातात देतोय. नुसतं आयुष्य नाही तर पुढच्या पिढीचं भविष्य यांच्या हातात देतोय. कारण यांना सत्तेत दहा वर्ष झाली म्हणजे एक पिढी पुढे सरकली. या पुढच्या पिढीसाठी जनतेने आताच शहाणे व्हायला पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनासंजय राऊतएकनाथ शिंदे