आता साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही ऑनलाइन विवाह नोंदणी सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:43 IST2025-09-30T10:42:24+5:302025-09-30T10:43:24+5:30
मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर सुविधा : दाम्पत्यास क्यूआर कोडसह प्रमाणपत्र मिळणार

आता साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही ऑनलाइन विवाह नोंदणी सेवा
मुंबई : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील ‘विवाह नोंदणी सेवा’अंतर्गत आता शनिवार व रविवारही ऑनलाइन पद्धतीने विवाह नोंदणी सुविधा उपलब्ध झाली आहे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान पालिकेच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जलद (फास्ट ट्रॅक) विवाह नोंदणीसाठी राखीव वेळ (अपॉइंटमेट्स) प्रणालीमार्फत तसेच प्रक्रियेशी संबंधित इतर सेवा ऑनलाइन स्वरूपात सुरू झाल्या आहेत.
साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी तसेच फास्ट-ट्रॅक विवाह नोंदणी सुरू करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. या सेवेंतर्गत विवाह नोंदणी प्रमाणपत्र क्यूआर कोडसह उपलब्ध होणार आहे. लवकरच डिजिलॉकर सुविधेतही विवाह नोंदणी प्रमाणपत्राचा समावेश होणार आहे.
तातडीच्या गरजेसाठी तसेच विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र त्याच दिवशी मिळण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सोमवार ते शुक्रवार) २० टक्के विवाह नोंदणी सेवा ही ‘फास्टट्रॅक’ म्हणून राखीव राहणार आहे. तर, शनिवारी व रविवारी विवाह नोंदणीकरिता इच्छुकांना वेळ मिळविण्यासाठी, ऑनलाइन अर्ज हा अपॉइंटमेंट दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत
करता येईल.
राज्य शासनाकडून धोरणात्मक सुधारणा
विवाह ठिकाण हे महाराष्ट्रातील असेल, तरच पालिकेकडे विवाह नोंदणी करता येत होती. परंतु, ही अट आता काढण्यात आली आहे. सबब, सद्यस्थितीत, जगातील कोणत्याही ठिकाणी विवाह झालेले जोडपे यांच्यापैकी कोणीही एक व्यक्ती, ज्या विभागात राहत असतील, त्या पालिकेच्या प्रशासकीय विभागामध्ये विवाह नोंदणी करू शकतात.
अडीच हजार रुपये शुल्क
जलद विवाह नोंदणीचे अर्ज त्याच दिवशी प्रक्रियेसाठी ऑनलाइन सादर करता येतील. साप्ताहिक सुटीतील आणि जलद विवाह नोंदणी सेवांसाठी नियमित शुल्क अधिक रुपये अडीच हजार रुपये इतके अतिरिक्त शुल्क लागू असेल. महापालिकेकडून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी म्हणजे सोमवार ते शुक्रवारदरम्यान २० टक्के विवाह नोंदणी सेवा ही ‘फास्टट्रॅक’ म्हणून राखीव राहणार आहे. त्यामुळे नोंदणीसाठी दाम्प्त्यास दिलासा मिळेल.
धार्मिक कक्षा रुंदावली
याआधी, पालिका कार्यालयांत हिंदू, मुस्लीम, बौद्ध, शीख, जैन धर्मीय या जोडप्यांची विवाह नोंदणी करता येत होती. आता, ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी यांसारख्या सर्व धर्मांच्या समान धर्मीय जोडप्यांनाही विवाह नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. शीख जोडप्यांसाठी वरील पर्याया व्यतिरिक्त, आनंद विवाह अधिनियम, १९०९ अंतर्गत नोंदणी अर्जाकरिता आता पालिका संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे.
शनिवारी या विभागीय कार्यालयांत सुविधा
दर शनिवारी पालिकेच्या विभाग कार्यालयांपैकी - ए, सी, ई, एफ दक्षिण, जी दक्षिण, एच पूर्व, के पूर्व, पी दक्षिण, पी उत्तर, आर मध्य, एल, एम पश्चिम, एस या १३ विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी सेवा देण्यात येईल.
दर रविवारी १२ विभागीय कार्यालयांत सेवा
दर रविवारी बी, डी, एफ उत्तर, जी उत्तर, एच पश्चिम, के पश्चिम, पी पूर्व, आर दक्षिण, आर उत्तर, एन, एम पूर्व, टी या १२ विभाग कार्यालयांत (वॉर्ड ऑफिस) विवाह नोंदणी करता येईल.