आता रोबोच्याही हाती मुंबईकरांची अग्निसुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 04:55 AM2018-09-20T04:55:51+5:302018-09-20T06:47:07+5:30

जवानांच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासनाचा निर्णय

Now firearm protection of Mumbaiites in Robo's hands | आता रोबोच्याही हाती मुंबईकरांची अग्निसुरक्षा

आता रोबोच्याही हाती मुंबईकरांची अग्निसुरक्षा

Next

मुंबई : मुंबईतआगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून काही वेळा आग विझविताना अग्निशमन दलातील जवानांच्या जिवावरही या घटना बेतत आहे. त्यामुळे धगधगत्या आगीत उडी घेऊन आगीवर नियंत्रण मिळवणारा अत्याधुनिक रोबो लवकरच खरेदी करण्यात येणार आहे. अग्निशमन जवान पोहोचू शकत नाहीत तिथे या रोबोची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे जीवित आणि वित्तहानी कमी होण्यास मदत होणार आहे, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये ग्लास फसाड म्हणजे काचेच्या इमारतींचे प्रमाण वाढले आहे. मात्र सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून उभ्या राहिलेल्या अशा इमारतींमध्ये मदत कार्य जिकिरीचे ठरत असते. अशाच काही आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझविताना जखमी झाले. गेल्या आठवड्यात आगीच्या घटनांमध्ये दोन जवान जखमी झाले होते. त्यामुळे अशा ठिकाणी रोबोचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेसाठी थ्री-लेयर हायटेक सूट महापालिकेने घेतला. त्याचबरोबर आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पीय भाषणात फायर रोबो खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यासाठी मागवलेल्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या कंपनीकडून एक फायर रोबो खरेदी केला जाणार आहे. संबंधित कंपनीला पाच वर्षे या रोबोची वॉरंटी आणि देखभाल करावी लागेल. यासाठी पालिका सुमारे ९२ लाख रुपये खर्च मोजणार आहे.

या ठिकाणी घेणार रोबोची मदत
जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आग लागल्यास, त्या कोसळण्याची शक्यता असते. काळबादेवी येथील गोकूळ इमारत आग दुघर्टनेत आग विझवण्यास आतमध्ये गेलेले अग्निशमन दलातील चार प्रमुख अधिकारी मृत्युमुखी पडले होते. या घटनेनंतर अशा प्रकारच्या जुन्या इमारतींमध्ये रोबोटचा वापर करण्याचा विचार सुरू झाला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षित अंतरावरून रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने फायर रोबोद्वारे आग विझविता येणार आहे. मुंबईतील उत्तुंग इमारती, मॉल्स व मल्टिप्लेक्समधील तळघरातील वाहनतळही धोकादायक ठरत आहेत. अशा ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्यास तळघरातील साठलेला धूर जवानांसाठी धोकादायक ठरतो.
तसेच पेट्रोकेमिकल्स कारखाने किंवा अणुऊर्जा संशोधन केंद्र अशा ठिकाणी आगीची घटना घडल्यास तिथे बचावकार्य राबविणे धोकादायक ठरते. काही दिवसांपूर्वी बुचर बेटावर लागलेल्या आगीच्या वेळी अग्निशमन दलातील अधिकारी व जवानांना अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये काम करावे लागले होते. अशा ठिकाणीही रोबोटचा वापर करता येऊ शकतो.

असा होणार रोबोचा वापर : आगीचा भडका उडाल्यानंतर प्रचंड उष्णतेमुळे जवान त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. मात्र रोबो आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ, चिंचोळ्या गल्ल्या, बेसमेंटची आग अशा ठिकाणी थेट जाऊन आगीवर नियंत्रण मिळवू शकणार आहे. कॉम्प्युटरच्या माध्यमातून सूचना देऊन या रोबोकडून काम करून घेतले जाणार आहे. रोबोमध्ये असलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने घटनास्थळी असणारी आगीची तीव्रता समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होईल.

Web Title: Now firearm protection of Mumbaiites in Robo's hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.