मस्तच! आता सामन्यांनाही विधीमंडळ पाहता येणार; 'ज्युनिअर ठाकरें'चा निर्णय, पटोलेंची सहमती

By मोरेश्वर येरम | Published: January 19, 2021 07:32 PM2021-01-19T19:32:12+5:302021-01-19T19:33:31+5:30

विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.

now common people can visit vidhan bhavan of maharashtra decision made by aditya thackeray | मस्तच! आता सामन्यांनाही विधीमंडळ पाहता येणार; 'ज्युनिअर ठाकरें'चा निर्णय, पटोलेंची सहमती

मस्तच! आता सामन्यांनाही विधीमंडळ पाहता येणार; 'ज्युनिअर ठाकरें'चा निर्णय, पटोलेंची सहमती

Next

राज्यातील पर्यटनवृध्दीसाठी लंडन आणि भारतीय संसदेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र विधानमंडळही जनतेसाठी खुले करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्त बैठकीत घेतला आहे.

विधानभवन येथे विधानमंडळ सचिवालय, गृह आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलिल, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव राजेंद्र जवंजाड, विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

"विधानमंडळ जनतेसाठी खुले करण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. त्यातून पर्यटन तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. या संदर्भात पर्यटन विभागाकडून सकारात्मकदृष्टया सहकार्य केले जाईल. तसेच पर्यटन विभाग, विधानमंडळ सचिवालय आणि गृह विभागामार्फत यासंदर्भात संयुक्तपणे नियमावली तयार करण्यात येईल. स्वागत कक्ष, पर्यटकांचे स्क्रीनिंग, ऑनलाईन बुकींग अशा विविध सुविधा उपलब्ध करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत", असं आदित्य ठाकरे म्हणाले. तर विधानसभा अध्यक्ष नाना पटोलो यांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला. 

"महाराष्ट्र विधानमंडळाला अनन्यसाधारण परंपरा लाभलेली आहे. याविधानमंडळातून अनेक दिग्गजांनी लोकसेवेची कारकीर्द गाजविली आहे. महाराष्ट्र विधानमंडळाने संमत केलेले अनेक कायदे देशपातळीवरही स्वीकारले गेले आहेत. गौरवशाली इतिहास लाभलेली वास्तू सामान्य जनतेला बघण्यासाठी खुली करणे गरजेचे आहे. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल. तसेच ही वास्तू राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे", असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.  सध्या मुंबई विधानमंडळात ही सुविधा सुरू करून कालांतराने नागपूर व पुणे येथील विधानमंडळ वास्तूही जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही ते पुढे म्हणाले. 
 

Web Title: now common people can visit vidhan bhavan of maharashtra decision made by aditya thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.