भुयारी मेट्रोच्या आजूबाजूला वीटही हलविता येणार नाही, एमएमआरसीएलकडून नोटीस जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:15 IST2024-01-04T15:14:48+5:302024-01-04T15:15:03+5:30
बांधकामामुळे भुयारी मार्गाला धोका पोहोचू नये यासाठी या मार्गिकेच्या ५० मीटर परिसरात बांधकाम करण्यापूर्वी यापुढे परवानगी घेण्याचे आवाहन मेट्रोकडून केले आहे.

भुयारी मेट्रोच्या आजूबाजूला वीटही हलविता येणार नाही, एमएमआरसीएलकडून नोटीस जारी
मुंबई : मुंबईतील पहिलीवहिली भुयारी मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो ३ च्या आजूबाजूच्या परिसरात कुठल्याही प्रकारचे बांधकाम करायचे असल्यास एमएमआरसीएलची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. बांधकामामुळे भुयारी मार्गाला धोका पोहोचू नये यासाठी या मार्गिकेच्या ५० मीटर परिसरात बांधकाम करण्यापूर्वी यापुढे परवानगी घेण्याचे आवाहन मेट्रोकडून केले आहे.
तशी नोटीस मेट्रोने जारी केली असून, परवानगी न घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मेट्रोने नोटिसीत म्हटले आहे. मेट्रो ३ मार्गिकेच्या ३३ किमी लांबीच्या प्रकल्पासाठी ३३ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही मेट्रो भुयारातून धावणार असून, त्यासाठी दोन बोगदे मेट्रोने तयार केले आहेत.
या कामासाठी घ्या परवानगी -
पुनर्विकास, बांधकाम, खोदकाम, विहिरी बांधणे, एखादे बांधकाम जमीनदोस्त करणे, भूगर्भीय अभ्यास अशा कामांसाठी एमएमआरसीएलची परवानगी घेणे आवश्यक आहे. एमएमआरसीएलच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करून ही परवानगी घेता येईल.
६.३५ मी व्यासाचे, २० ते २२ मी खोल व जमिनीपासून १७ ते २५ मी अंतरावर हे बोगदे बांधले आहेत. भविष्यात या बोगद्यांच्या आजूबाजूच्या विभागात पुनर्विकास, खोदकाम व इतर बांधकामांमुळे धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम करण्यापूर्वी एमएमआरसीएलकडून परवानगी घेणे आवश्यक असल्याचे उपव्यवस्थापक श्वेतल कनवाळू यांनी नोटिसीत म्हटले आहे.