लोअर परळ, दादर, प्रभादेवी येथे दोन दिवस पाणी नाही; मुख्य जलवाहिनीची होणार दुरुस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:33 IST2024-11-27T15:31:40+5:302024-11-27T15:33:24+5:30
वरळी येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकातील तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जलअभियंता विभागातर्फे हाती घेणार आहे.

लोअर परळ, दादर, प्रभादेवी येथे दोन दिवस पाणी नाही; मुख्य जलवाहिनीची होणार दुरुस्ती
मुंबई :
लोअर परळ परिसरातील १,४५० मिलिमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, २८ नोव्हेंबरला रात्री १० ते शुक्रवार, २९ नोव्हेंबरदरम्यान रात्री आठपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत लोअर परळ (जी दक्षिण), दादर, प्रभादेवी (जी उत्तर) आसपासच्या विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णत:, तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.
वरळी येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकातील तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जलअभियंता विभागातर्फे हाती घेणार आहे. गुरुवारी रात्री १० वाजता हे काम सुरू होईल; तर, शुक्रवार रात्री ८ वाजता ते पूर्ण होईल. या कामासाठी जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कालावधीत पालिकेच्या ‘जी दक्षिण’ व ‘जी उत्तर’ विभागातील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
या विभागांचा पाणीपुरवठा बंद
करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग, बीडीडी चाळ, संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्शनगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग.
अंशत: बंद
सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरुणकुमार वैद्य मार्ग परिसराचा पाणीपुरवठा अंशत: (३३ टक्के) बंद राहील.