विमानतळाच्या नामकरणात राजकीय रंग नको; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 14:34 IST2023-10-09T14:33:26+5:302023-10-09T14:34:15+5:30

त्यामुळे या प्रकरणाला कोणीही राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.

No political color in airport naming; Union Minister of State Kapil Patil's appeal | विमानतळाच्या नामकरणात राजकीय रंग नको; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन

विमानतळाच्या नामकरणात राजकीय रंग नको; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी प्रकल्प ग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे. उत्स्फूर्त झालेल्या या लढ्याची दखल घेत राज्य आणि केंद्र शासनाने यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. हे एका व्यक्तीचे किंवा पक्षाचे यश नसून दिबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे आहे. त्यामुळे या प्रकरणाला कोणीही राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. यासंदर्भात  कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी कृती समितीची बैठक वाशी येथे पार पडली.  या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक आदी उपस्थित होते. 

- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला आहे. एव्हिएशन विभागाकडून हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे गेला आहे.पुढील तीन चार दिवसांत याप्रकरणी सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास कपिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच हा प्रत्येकाच्या अस्मितेचा आणि तितकाच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यात कोणीही गटबाजी करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कृती समितीची लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी याप्रक्रियेला गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्याची सूचना गणेश नाईक यांनी या बैठकीत केली आहे. त्यानुसार संघर्ष समितीतील २० ते २५ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच ही बैठक घेतली जाणार असल्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: No political color in airport naming; Union Minister of State Kapil Patil's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.