"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:48 IST2025-12-29T15:48:01+5:302025-12-29T15:48:37+5:30
समाजकारण आणि राजकारण माझ्यासाठी कधीही सत्तेचं किंवा प्रतिष्ठेचं साधन नव्हतं. ते लोकांसाठी काम करण्याचं माध्यम होतं असं सुरेखा पाटील यांनी म्हटलं.

"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीमुळे प्रत्येक पक्षात बंडखोरी आणि नाराजी उफाळून आली आहे. मुंबईतील वार्ड क्रमांक २७ च्या माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे. मी लढणार, मी मोडणार पण मी कधीच थांबणार नाही असं सांगत सुरेखा पाटील यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत.
सुरेखा पाटील यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, आज तुमच्याशी संवाद साधताना माझं मन प्रचंड भावनांनी भरून आलं आहे. इतक्या मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या प्रत्येकाचे, घेतलेल्या निर्णयाला उघडपणे विरोध करणाऱ्या प्रत्येकाचे आणि या सगळ्या परिस्थितीतही मला दुर्लक्षित न करता समजून घेणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार. तुमचा पाठिंबा, तुमचा आवाज आणि तुमचा विश्वास हेच आज मला उभं राहण्याचं बळ देत आहेत. मी कुठल्याही मोठ्या घराण्यातून आलेली नाही. अतिशय साध्या, सामान्य कुटुंबात वाढलेली एक मुलगी आहे. मी संघर्ष, कष्ट आणि प्रामाणिकपणा याच मूल्यांवर माझं आयुष्य घडलं. समाजकारण आणि राजकारण माझ्यासाठी कधीही सत्तेचं किंवा प्रतिष्ठेचं साधन नव्हतं. ते लोकांसाठी काम करण्याचं माध्यम होतं. लोकांमध्ये राहणं, त्यांच्या अडचणी ऐकणं आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणं यातूनच मला खरा आनंद मिळत गेला असं त्यांनी सांगितले.
तसेच याच काळात माझ्या स्वतःच्या आरोग्याशी संबंधित गंभीर आव्हानंही उभी राहिली. हृदयाशी संबंधित आजार वाढत गेला, त्रास होत राहिला, पण मी कधीही त्याचा उल्लेख केला नाही, कधीही त्याला पुढे आणलं नाही. कारण माझ्या वेदनांपेक्षा लोकांच्या प्रश्नांची जबाबदारी मला अधिक मोठी वाटत होती. गेल्या आठ वर्षांत मी अखंडपणे, न थकता काम केलं. कोणत्याही पदासाठी नाही, कोणत्याही स्वार्थासाठी नाही तर फक्त जनतेसाठी. सगळे लोक कायम माझ्या बाजूने असतीलच असं नाही, हे मला माहीत आहे. पण माझं मन, माझी निष्ठा आणि माझं काम कधीही डळमळीत झालं नाही. आज इतकी वर्षं केलेलं प्रामाणिक, सातत्यपूर्ण काम दुर्लक्षित केलं गेलं, ही वेदना नाकारता येणार नाही. हे पाहताना मन दुखावलं. पण ही लढाई कधीच केवळ तिकीटाची किंवा पदाची नव्हती. ही लढाई लोकांसाठी होती, आहे आणि राहील. अन्याय कितीही मोठा असला, तरी सत्याची बाजू सोडून देणं माझ्या स्वभावात नाही. मी लढणार, मी मोडणार, पण मी कधीच थांबणार नाही असं सुरेखा पाटील यांनी म्हटलं आहे.