'नितीन गडकरींचा सल्ला 106 बेरोजगार अन् लावारीस ट्रोलर्संनी अंगीकारावा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 12:28 PM2021-05-10T12:28:26+5:302021-05-10T12:30:11+5:30

कोविड काळात राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असं नाही, अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही.

Nitin Gadkari's advice should be followed by 106 unemployed unlawful trolls MLA amol mitkari | 'नितीन गडकरींचा सल्ला 106 बेरोजगार अन् लावारीस ट्रोलर्संनी अंगीकारावा'

'नितीन गडकरींचा सल्ला 106 बेरोजगार अन् लावारीस ट्रोलर्संनी अंगीकारावा'

Next
ठळक मुद्देशब्दात गडकरी यांनी भाजपा नेते व कार्यकर्त्यांना सूचनावजा सल्ला दिला. नागपूर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. 

मुंबई - राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे. हा खरा राजकारणाचा अर्थ आहे अशा शब्दात भाजपा नेते नितीन गडकरींनी नेते आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. यावेळी, भाजपा नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही गडकरी यांनी हात जोडून विनंती केली. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या 106 आमदारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.  

कोविड काळात राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असं नाही, अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करू नका. एकच ऑक्सिजन सिलेंडर देऊन ४ जण फोटो काढतात हे चांगले नाही. त्यातून आपल्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतो, अशा शब्दात गडकरी यांनी भाजपा नेते व कार्यकर्त्यांना सूचनावजा सल्ला दिला. नागपूर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. 

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नितीन गडकरी म्हणाले की, नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच त्याचा भाग नाही, यावेळी गरिबांच्या मागे, समाजामागे धर्म, पक्ष विसरून मदत करा. त्याचे फळ पक्षाला नक्की मिळतं. वाईट काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलो तर ते कधीच विसरत नाही. राजकीयदृष्ट्या विरोधक असले तरी सगळ्यांच्या मागे उभं राहणं सामाजिक दायित्व आहे. मला कोविड होत नाही म्हणून काहीजण गाफील राहतात. आजही अनेक नगरसेवक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी कोविडमध्ये बेफिकिरपणे वागतायेत असेही त्यांनी म्हटले. नितीन गडकरींना कार्यकर्त्यांना हा सल्ला दिल्यानंतर सोशल मीडियातून त्यांचं कौतुक होत आहे. तसेच, भाजपामधील आवडता एकमेव नेता, म्हणूनही अनेकजण त्यांचं नाव घेत आहेत.   

राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी गडकरींच्या या सल्ल्यानंतर ट्विट करुन भाजपा आमदारांना डिवचले आहे. तसेच, सोशल मीडियावर ट्रोलिंग करणाऱ्या नेटीझन्सलाही त्यांनी सल्ला दिलाय. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला सल्ला सर्वांना अनुकरणीय आहे. मुत्सद्दी व संयमी असा हा नेता मला आवडतो. संघविचाराशी मी कधीच सहमत नसेल. मात्र, गडकरींसारख्या नेत्यांचा सल्ला राज्यातील 106 बेरोजगार, लावारीस ट्रोलर्स  व त्यांच्या अहंकारी वाचाळविरांनी सुद्धा अंगीकारावा, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केलंय. आपल्या ट्विटमधून मिटकरी यांनी भाजपाच्या 106 आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. 

स्वत:च्या आरोग्याची अन् कुटुंबीयांची काळजी घ्या

अतिउत्साहीपणा करू नका. शक्यतो व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करा. कोणाच्या घरी जाऊ नका. तुम्ही जितकं सहजपणे घेता तसं घेऊ नका. जी कामं आहेत ती घरून करा. कार्यकर्त्यांना गमावणं पक्षाला परवडणारं नाही. आपला जीव वाचला तर पक्षाचं काम होईल. मी रोज सकाळी १ तास प्राणायम करतो. या व्यायामामुळे माझी तब्येत ठीक आहे. उर्जा वाढली. औषधं घेऊन तब्येतीची काळजी घेऊन कामं करतो. कामाच्या भावनेच्या भरात अनेकांनी काळजी घेतली नाही. पहिलं प्राधान्य आपलं आरोग्य, आपलं कुटुंब त्यानंतर पक्ष आणि समाजाचं काम करणं. स्वत:कडे लक्ष द्या. मला कोविड होत नाही अशा भ्रमात राहू नका. जे जे मला सांगत होते मला कोविड होत नाही त्या सगळ्यांना कोविड झाला. लसीकरणासाठी प्रयत्न करा. घराची, कुटुंबाची समाजाची काळजी घ्या असा सल्ला नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला आहे.   
 

Web Title: Nitin Gadkari's advice should be followed by 106 unemployed unlawful trolls MLA amol mitkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.