Mumbai: दहिसर टोलनाक्यावरून राजकारण तापले; एका पत्राने शिंदेंच्या निर्णयावर पाणी, सरनाईक ट्रोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 08:02 IST2025-11-17T08:01:03+5:302025-11-17T08:02:18+5:30
Dahisar Toll Naka: दहिसर टोलनाक्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai: दहिसर टोलनाक्यावरून राजकारण तापले; एका पत्राने शिंदेंच्या निर्णयावर पाणी, सरनाईक ट्रोल!
मिरा रोड: दहिसर टोलनाका स्थलांतराचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तरी वनमंत्री गणेश नाईकांसह भाजपचा त्याला विरोध होत आहे. असे असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वरसावे खाडी पुलापलीकडे राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका संयुक्तिक नसल्याचे स्पष्ट केल्याने टोलनाका स्थलांतराचा मार्ग बंद झाला आहे.
दहिसर टोलनाक्यामुळे गेली अनेक वर्षे वाहतूककोंडीचा सामना मिरा-भाईंदर, वसई-विरारसह अन्य भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. टोलनाका हटवण्याच्या दृष्टीने अनेक आंदोलने झाली, मात्र टोलनाका काही हटला नाही. परिवहनमंत्री झाल्यावर सरनाईक यांनी टोलनाका हटवणारच, असे जाहीर करत प्रतिष्ठेचा विषय केला.
उपमुख्यमंत्री शिंदेंकडे बैठक घेऊन टोलनाका अन्यत्र हलवण्याचा निर्णय झाला. टोलनाका वरसावे महामार्गावर व नंतर वरसावे खाडीपूल पलीकडे नायगाव हद्दीत नेण्याबाबत मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. मात्र भाजपचे नेते वनमंत्री गणेश नाईक, भाजपचे माजी उपमहापौर चंद्रकांत वैती, भूमिपुत्र संघटना, काँग्रेसचे विजय पाटील आदींनी टोलनाका होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. टोलनाका अन्यत्र उभारण्यास भाजपकडून विरोध होत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्री सरनाईक यांना पत्र देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील महामार्गावर टोलनाका उभारणीस नकार दिला.
पर्यायी उपाय करा : गडकरी
दहिसर टोलनाका स्थलांतरामुळे प्राधिकरणाच्या दोन टोल प्लाझामधील अंतर हे ३० किमीपर्यंत होईल. राष्ट्रीय महामार्गावर गैरराष्ट्रीय टोल प्लाझाचे स्थलांतर हे राष्ट्रीय टोल धोरणांशी सुसंगत नाही, असे स्पष्ट केले, तर दहिसर टोलनाक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी तो प्राधिकरणाच्या अधिकारातील महामार्गावर स्थलांतरित करण्याऐवजी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना नितीन गडकरी यांनी केली.
परिवहनमंत्र्यांची खिल्ली
भाजपचा विरोध आणि त्यात केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पत्राने दहिसर टोलनाका प्राधिकरणाच्या महामार्गावर स्थलांतरचा मार्ग बंद झाला आहे. मंत्री सरनाईक यांनी टोलनाका हटवण्याचे दिलेले आश्वासन हे टोलनाका ५-१० फूट हटवून पूर्ण केले आहे. मात्र त्यांनी कोंडी फुटणार की नाही, हे सांगितले नव्हते, अशी खिल्ली भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी उडवली आहे.
नागरिकांची 'कोंडी'
टोलनाका हटवण्याचा निर्णय घेतल्याने मीरा भाईंदर, वसई विरारसह हजारो लोकांची कोंडीच्या जाचातून सुटका झाली असती. मात्र नाका हटवण्याचे श्रेय शिवसेनेला मिळू नये, असे काही नेत्यांना वाटत असल्याने त्यांनी विरोध केला, असे शिंदेसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रम प्रताप सिंग म्हणाले.