Nitesh Rane On Aditya Thackeray: युएईमध्ये सध्या आशिया कप स्पर्धा सुरु असून भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी साखळी फेरीतील सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावरुन शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. दहशतवादी कारवाया करणाऱ्या देशासोबत सामना खेळणे हा राष्ट्रीय भावनांचा अपमान आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून या सामन्याचा निषेध करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. यावरुनच भाजपकडून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे हे स्वतः उद्या सामना पाहतील असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलीय. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. ज्या पाकिस्तानबरोबर आपण युद्ध केले, त्यांच्याशी उद्या क्रिकेट सामना खेळणार आहोत. पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे म्हणजे देशभक्तीची थट्टा असून हा देशभक्तीचा व्यापार चालला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मत्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
"आदित्य ठाकरे उद्या बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान सामना पाहतील. त्यांचा आवाजही असा आहे की तो त्यांना फायदेशीर ठरेल. ते पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाही देतील," अशी बोचरी टीका नितेश राणेंनी केली.