Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रड्या ऑफ द इअर अवॉर्ड संज्यालाच दिला पाहिजे!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 13:57 IST

राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा शिगेला पोहोचला आहे.

नवी दिल्ली - राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपाचं बिनसलं असून, 25 वर्षांपासूनची युती तुटली आहे. शिवसेनेचे केंद्रातील अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देत भाजपावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या खासदारांनाही विरोधी बाकावर जागा देण्यात आली. राज्यसभेत आसनव्यवस्थेत बदल केल्यानं शिवसेना खासदार संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली असून, राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडूंना पत्रही पाठवलं आहे.तोच धागा पकडत भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. तिसऱ्या रांगेवरून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला. 2019चा रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड संज्याला दिला पाहिजे. मी कुठे बसतो त्यापेक्षा त्या पदाचा उपयोग देशाला कसा होईल हा विचार पाहिजे. पण याचं राजकारण म्हणजे मी, मला आणि मीच, असं म्हणत निलेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, तत्पूर्वीच शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिलेला असून ते एनडीएच्या बैठकीलाही आले नाहीत. त्यामुळेच त्यांच्यावर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आलेली आहे, असंही त्यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले होते. तर दुसरीकडे शिवसेनेला बैठकीचं निमंत्रणच दिलं नसल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर त्यांना विरोधी बाकांवर बसवलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेतही त्यांच्या आसन व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत मला स्थान देणं हे धक्कादायक आहे. शिवसेनेच्या भावना दुखावत त्यांचा आवाज दाबण्यासाठीच असे प्रकार केले जात आहेत. त्यावरूनच त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठविले. विशेष म्हणजे निलेश राणेंनी यापूर्वीसुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. बाळासाहेब जाऊन आता सात वर्षं झाली, परंतु बाळासाहेबांचं स्मारक यांना बांधता आलेलं नाही. उद्धवना लाज वाटली पाहिजे, असंही म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं.  

टॅग्स :संजय राऊतमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस