तीन कोटींचे निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर्स जप्त; मुंबई गुन्हे शाखेची उमरखाडीच्या गोदामात धाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:22 IST2025-11-06T12:21:26+5:302025-11-06T12:22:03+5:30
एकूण १,८३१ बॉक्स जप्त करण्यात आले

तीन कोटींचे निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर्स जप्त; मुंबई गुन्हे शाखेची उमरखाडीच्या गोदामात धाड
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गुन्हे शाखेने उमरखाडी येथील एका गोदामात छापा टाकून तब्बल तीन कोटी रुपयांचा निकोटिनयुक्त फ्लेवर्सचा साठा जप्त केला. ते मुंबईसह महानगर प्रदेशातील वैध अवैध हुक्का पार्लरना मागणीप्रमाणे विकली जात होते. ‘एसक्युब डिस्ट्रीब्युशन एजन्सी एलएलपी’ या कंपनीकडून परदेशातून आयात केलेल्या शासनाने बंदी घातलेल्या निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर्सचा साठा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी विक्री करण्यात येत होता.
उमरखाडी येथील गोदामात हा साठा ठेवला होता. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेने छापा टाकला. तेथे सचिन सुशीलकुमार सुरी (वय ४९) याने हुक्का फ्लेवर्सचा साठा करून ठेवलेला आढळला. हे उत्पादन अल बखर परदेशी कंपनीचे असून, ते एसक्यूब एजन्सीने आयात केले. ही एजन्सी मुंबई महानगर प्रदेशातील हुक्का पार्लरना हे फ्लेवर मागणीप्रमाणे अवैधरीत्या विकते आहे, अशी नेमकी माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष एकचे प्रभारी निरीक्षक अजय
कुलकर्णी यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने मंगळवारी छापा टाकून कारवाई केली.
- १,८३१ बॉक्स जप्त
- ३ कोटींपेक्षा जास्त एकूण किंमत
यातील एकाही पाकिटावर संविधानिक इशारा नव्हता, असे गुन्हे शाखेने सांगितले. डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत तपास सुरू आहे.