"निवडणूक हरलो जरी, तरी मी विझलो नव्हतो..."; खासदार उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:28 IST2025-07-17T17:27:01+5:302025-07-17T17:28:23+5:30

"काँग्रेसने निवडणुकीत मला देशद्रोही ठरवले होते. माझ्यासाठी हा धक्काच होता," असेही ते म्हणाले

Newly elected Rajya Sabha MP Ujjwal Nikam said I lost lok sabha elections but never gave up | "निवडणूक हरलो जरी, तरी मी विझलो नव्हतो..."; खासदार उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केल्या भावना

"निवडणूक हरलो जरी, तरी मी विझलो नव्हतो..."; खासदार उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केल्या भावना

लोकसभेच्या निवडणुकीत ज्येष्ठ वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा पराभवा झाला होता. त्यानंतर वर्षभराने म्हणजेच, १२ जुलैला उज्ज्वल निकम यांनी राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त करण्यात आले. याबाबत बोलताना, "जरी मी निवडणूक हरलो होतो, तरी मी विझलो नव्हतो, पण हे विरोधकांना कळले नाही..." अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनोस्कोचा जागतिक मानांकन मिळण्याच्या कार्यात मोठे योगदान दिल्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार आणि राज्यसभेत नियुक्ती झाल्याबद्दल अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा सांताक्रूझ येथे भाजपा उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

त्या रात्री मला झोप लागली नाही...

"मुंबई महापालिकेची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. पण कार्यकर्त्यांनी सावध राहायला हवे. रात्र वैऱ्याची आहे. फेक नरेटिव्ह आणि अफवा पसरवणाऱ्यांपासून आपल्याला सावध रहायला हवे. भाषेच्या नावाने असेच फेक नरेटिव्ह पसरवले जात आहे. लोकसभेच्या वेळी आपण या फेक नरेटिव्हला बळी पडलो. म्हणून आता अधिक सावध रहायला हवे. मला तर काँग्रेसने निवडणुकीत देशद्रोही ठरवले. माझ्यासाठी हा धक्काच होता. देशाच्या विरोधात मी विचारही करु शकत नाही. मला त्या रात्री झोप लागली नाही. मी न्यायालयात जाऊन त्यांच्या विरोधात लढलो असतो, पण त्याने आरोप करणाऱ्यांनाच अधिक प्रसिद्ध मिळाली असती. म्हणून मी टाळले. त्यामुळे अशा लोकांपासून भाजपा कार्यकर्त्यांनी सावध रहायला हवे", असे अ‍ॅड. निकम म्हणाले.

भाजपा अन् इतर पक्षात फरक आहे...

"राज्यसभेवर चांगल्या व्यक्तीला पाठवण्याची वेळ आली, तेव्हा शरद पवार यांच्या पक्षाने मुंबईकरांसाठी लढणाऱ्या वकिलाला पाठवले नाही. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब आणि अन्य देशविरोधी खटल्यातील आरोपींची बाजू घेऊन लढणाऱ्या वकिलाला राज्यसभेत पाठवले. उबाठाने तर बाँम्बस्फोटातील शिक्षा भोगून आलेल्या मुसा याला घेऊन प्रचार केला. याकूबला फाशी होऊ नये म्हणून काँग्रेसचे जे आमदार स्वाक्षरी मोहीम राबवत होते, त्यांना मंत्री करण्याचे काम काँग्रेसने केले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते सहभागी होते. पण भाजपाने याकूब, कसाबला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून लढणाऱ्या मुंबईकरांचे वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना पाठवले. म्हणून भाजपा आणि अन्य पक्षात फरक आहे" अशा शब्दांत मंत्री आशिष शेलार यांनी विरोधी पक्षावर हल्ला चढवला.

Web Title: Newly elected Rajya Sabha MP Ujjwal Nikam said I lost lok sabha elections but never gave up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.