New ticket rates will be effective from 27 August; ST Corporation information | ST Ticket Rate: नवे तिकीट दर २७ ऑगस्टपासून लागू होणार; एसटी महामंडळाची माहिती
ST Ticket Rate: नवे तिकीट दर २७ ऑगस्टपासून लागू होणार; एसटी महामंडळाची माहिती

मुंबई : राज्यभरातील प्रत्येक विभागातील एसटी बसमधून प्रवास करताना सामान भाड्यासाठी पाचपटीने तिकीट आकारणी करण्यात येणार आहे. २७ ऑगस्टपासून सामानाच्या तिकिटाचे किमान भाडे पाच रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत किमीनुसार आकारण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळाने २० किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान असल्यास पाचपट भाडे आकारण्याचा निर्णय नुकताच घेतला. हा निर्णय राज्यातील प्रत्येक आगारांमध्ये पाठविण्यात आला आहे. सामानाच्या भाडेवाढीचा निर्णय प्रवाशांच्या माहितीसाठी प्रत्येक आगारातील फलकावर लावण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे.
एसटी महामंडळाने जून २०१९ मध्ये प्रवासी भाड्यात वाढ केली होती. त्यानंतर आता प्रवाशांच्या सामानाची भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे कंबरडे मोेडणार आहे.

तिकीट मशीनमध्ये करणार बदल
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सामानाची भाडेवाढ केली आहे. मात्र ट्रायमॅक्स इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सर्व्हिसेस कंपनीकडून वाहकांना ईटीआयएम मशीनमध्ये सामानाचे पाचपटीचे दर आकारण्याची सुविधा नाही. त्यामुळे वाहकांना सामानाचे भाडे आकारताना अडचणी येतील. यासाठी तिकीट मशीन सुधारण्यात येणार आहेत.

२० किलोपेक्षा कमी सामान मोफत नेता येणार
प्रवाशांजवळ असलेले २० किलोपेक्षा कमी वजनाचे सामान एसटीमधून मोफत घेऊन जाता येणार आहे. मात्र २० किलोपेक्षा जास्त वजनाच्या सामानासाठी प्रवाशांकडून पाचपट अधिक दर आकारला जाणार आहे.

अशी होणार किमान व कमाल दर आकारणी
- शून्य ते ८४ किमीसाठी २० ते ४० किलोपर्यंतच्या सामानासाठी ५ रुपये आकारण्यात येतील. तर, शून्य ते ६०० किमीसाठी २० ते ४० किलोपर्यंतच्या सामानासाठी ५० रुपये आकारण्यात येणार आहेत.
- शून्य ते ७२ किमीसाठी ४० ते ५० किलोपर्यंतच्या सामानासाठी १० रुपये आकारण्यात येतील. तर, शून्य ते ६०० किमीसाठी ४० ते ५० किलोपर्यंतच्या सामानासाठी १०० रुपये आकारण्यात येणार आहेत.

Web Title: New ticket rates will be effective from 27 August; ST Corporation information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.