कुठल्याही खड्ड्यांसाठी आता महापालिकेचे नवे धाेरण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 10:24 IST2026-05-20T10:24:36+5:302026-05-20T10:24:59+5:30
रस्ते काँक्रीटीकरणाचा खर्च वाया जात असल्याने निर्णय

कुठल्याही खड्ड्यांसाठी आता महापालिकेचे नवे धाेरण !
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेने रस्त्यांचे काँक्रीटीकरण केल्यानंतर विविध प्राधिकरणे आणि कंपन्यांकडून विविध कामांसाठी चर खोदले जात आहेत. परिणामी रस्त्यांची पुन्हा होणारी दुरवस्था थांबविण्यासाठी पालिका लवकरच नवीन चर मार्गदर्शक धोरण आणणार आहे. त्यात चर कोणी खोदावेत? कशासाठी आणि किती प्रमाणात खोदावेत? त्यानंतर संबंधित प्राधिकरणे, कंपन्यांची जबाबदारी काय असेल? दुरवस्थेसाठी काय दंड असेल, याचा समावेश असेल, असे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
मुंबईकरांना सेवा पुरवण्यासाठी विविध प्राधिकरणे आणि सेवा कंपन्या रस्ते खोदून त्याखाली केबल्स, जलवाहिन्या, मलनि:स्सारण वाहिन्या टाकतात. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होत असल्याने चर खोदण्यासाठी पालिकेने मार्गदर्शक धोरण अवलंबिले आहे. रस्ता खोदताना तो कसा आणि किती प्रमाणात खोदला जाईल, या संबंधी ही सूचना धोरणात नमूद केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यात अनेकदा अशा ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडतात, तर काही ठिकाणी दुर्घटना होण्याची भीती असते. खड्डे बुजवण्यासाठी जशी पालिकेला निधीची तरतूद करावी लागते, त्याचप्रमाणे चर बुजविण्यासाठीही खर्च करावा लागत आहे. मार्गदर्शक सूचना, दंडात्मक कारवाई आणि नियमांचा समावेश करून नवीन धोरण आणणार असल्याची माहिती भिडे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्हीआयपींच्या सुरक्षा व्यवस्थेतील गाड्यांचा ताफा कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी घाटकोपर ते दादरपर्यंत उपनगरी एसी लोकलने प्रवास केला. मुंबई महापालिकेकडून पावसाळ्यापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी सुरू असलेल्या पर्जन्यजल उदंचन केंद्रांच्या (पम्पिंग स्टेशन) पाहणी दौऱ्यात त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. सकाळी ऐन गर्दीच्यावेळी महापौरांनी केलेला रेल्वेप्रवास हा चर्चेचा विषय ठरला.