नौदलाच्या रायफल चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपी निघाला जवानांच्या तुकडीतील अग्निवीर, तेलंगणापर्यंत तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:42 IST2025-09-12T16:39:53+5:302025-09-12T16:42:45+5:30
कुलाब्यातील नौदलाच्या निवासी वसाहतीच्या संरक्षणासाठी तैनात जवानाकडील रायफल आणि मॅगझिन चोरी झाल्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर

नौदलाच्या रायफल चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपी निघाला जवानांच्या तुकडीतील अग्निवीर, तेलंगणापर्यंत तपास
Navy Gun Robbery: कुलाबा नेव्ही नगर इथल्या नौदलाच्या संवेदनशील व प्रतिबंधित क्षेत्रात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानाची रायफल चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. जवानाला खोटी माहिती देऊन त्याच्याकडील इन्सास रायफल व २०-२० राऊंडच्या मॅग्झीन घेऊन पळालेल्या दोन सख्या भावांना अटक करण्यात आली. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेलंगणात केली. राकेश डुब्बुला व उमेश डुब्बुला ही आरोपींची नावे असून, यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.
सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानाला खोटी माहिती देऊन, नौदलाच्या गणवेशात आलेल्या तरुणाने नौदलाचा जवान असल्याचे भासवले. त्याच्याकडून रायफल व शस्त्रसाठा ताब्यात घेतला होता. त्यानंतर जवान हॉस्टेलला जाण्यास निघाला. मात्र, कर्तव्याच्या ठिकाणी घड्याळ विसरल्याचे लक्षात आल्यानंतर जवान आला. त्यावेळी तो जवान तिथे नव्हता. रायफल, ८० जिवंत राऊंडसह त्याने पोबारा केल्याचे उघडकीस आले. ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी ही घटना घडली होती.
तपासादरम्यान, अटक करण्यात आलेला २२ वर्षीय अग्निवीर राकेश डुब्बुला आणि तक्रारदार एकाच बॅचचे असल्याचे समोर आलं. दोघेही २०२३ मध्ये भरती झाले होते. गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात नवीन माहिती समोर आल्यामुळे, गुन्हे शाखा तक्रारदाराचीही चौकशी करू शकते. पोलिसांना सांगितले की डुब्बुला केरळमधील कोची येथून मुंबईत आला होता. "दोन्ही आरोपींनी ६ सप्टेंबर रोजी हा गुन्हा केला. रायफल आणि मॅगझिन मिळाल्यानंतर, आरोपी सीएसएमटीला गेले, तेथून ते कल्याण, पुणे, वाडी जंक्शन आणि सिकंदराबादला गेले. आरोपी तेलंगणातील आसिफाबादचे रहिवासी असल्याने, त्यांचे नक्षलवाद्यांशी काही संबंध आहेत का याचा तपास सुरू आहे," असंही पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखेने तपास सुरू केला असता आरोपी तेलंगणामधील आसिफाबाद येथे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आसिफाबाद पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक केली.