दादरमध्ये नव्या 'बॉटलनेक'चे विघ्न, लोकमान्य टिळक पुलाचा रेल्वे रुळांवरील भाग अरुंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:13 IST2025-09-04T11:12:11+5:302025-09-04T11:13:03+5:30
वाहतूककोंडीने हैराण झालेले मुंबईतील नागरिक आणि वाहनचालकांना आणखी एका बॉटलनेकला सामोरे जावे लागत आहे.

दादरमध्ये नव्या 'बॉटलनेक'चे विघ्न, लोकमान्य टिळक पुलाचा रेल्वे रुळांवरील भाग अरुंद!
सुजित महामुलकर
वाहतूककोंडीने हैराण झालेले मुंबईतील नागरिक आणि वाहनचालकांना आणखी एका बॉटलनेकला सामोरे जावे लागत आहे. दादर टीटी पूर्व ते प्लाझा सिनेमा पश्चिम परिसराला जोडणाऱ्या लोकमान्य टिळक पुलाच्या पूर्वेकडील रस्त्याचे रुंदीकरण झाले असले तरी रेल्वे रुळांवरील पुलाचा भाग मात्र जैसे थेच राहिल्याने रस्ता निमुळता होतो. त्यामुळे सकाळी-सायंकाळी गर्दीत वाहतूककोंडीचा प्रचंड फटका बसू लागला आहे. या त्रासातून पुढील एक ते दीड वर्षे तरी सुटका होण्याची चिन्हे दिसत नाही.
दादरहून उत्तरेकडे जाण्यासाठी असलेला सायनचा पूल आधीच पुनर्बांधणीसाठी बंद केले आहे, तर दक्षिणेकडील एल्फिन्स्टन पूलही बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे टिळक पुलावरच वाहनचालकांची पूर्ण भिस्त आहे. परिणामी या पुलावरील वाहतूक कोंडी रोजच्या दिनचर्येचा भाग झाला आहे. एवढ्या कसरतीनंतरही जर कोंडीत अडकायचेच असेल तर वाहन सोसायटीतून वर्षभर बाहेरच न काढलेले बरे, नव्या पुलानंतर भविष्यात तरी दादरमधील रहिवाशांना दिलासा मिळो अशी गणपतीकडे प्रार्थना, अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवासी जितेंद्र पडवळ यांनी दिली.
पुलाचे फायदे
- दादरमधील कोंडीतून मोठा दिलासा
- पूर्व-पश्चिम जोडणी अधिक सुलभ
टिळक पूल ट्विन केबल-स्टेड रोड ओव्हर ब्रिज
पहिला टप्पा-
जुन्या पुलाच्या शेजारी नव्या पुलाची बांधणी. वाहतुकीत कोणताही अडथळा न आणता काम सुरू. नवा पूल पूर्ण झाल्यावर वाहतूक तिकडे वळवणे.
दुसरा टप्पा
जुला पूल हटवून दुसऱ्या बाजूचा केबल स्टेड पूल पूर्ण करणे.
पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत मार्गी
पहिल्या टप्प्याचे काम ऑक्टोबर-डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे महारेलकडून सांगण्यात आले. त्यामुळे किमान पुढील दीड वर्षे मुंबईकरांना या नव्या ट्रॅफिक ट्रॅपची रोजची शिक्षा भोगावी लागणार आहे.
३७५ कोटी ट्विन केबल पूल
१. पुलाचे काम करणाऱ्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) यांच्या म्हणण्यांनुसार सध्या केलेले रुंदीकरण हे पुढील टप्प्याच्या कामासाठीची तात्पुरती तरतूक आहे.
२. टिळक पुलालगतच ३७५ कोटी रुपयांचा ट्विन केबल पूल उभारला जात आहे.
३. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर टिळक पुलावरील वाहतूक त्या दिशेने वळवली जाईल आणि जुना पूल पाडून दुसरा टप्पा सुरू होईल.