Join us  

ना सभा, ना अमित शाह; अशोक चव्हाणांचा भाजपा प्रवेश घाईघाईत, हे आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:14 PM

अशोच चव्हाण यांनी काँग्रेसमधील राजीनाम्यानंतर ‘लोकमत’शी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबई - काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव होता, कोणाचे ऐकायचे नाही, मनाचे करायचे असे चालले होते. पक्ष जिंकावा यासाठीचे कोणतेही नियोजन होत नव्हते, या शब्दात अशोक चव्हाण यांनी राजीनाम्यानंतर खंत व्यक्त केली आहे. तर, केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपा प्रवेश होईल, अशी चर्चा होती. मात्र, आजच ते कमळ हाती घेणार आहेत. 

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील राजीनाम्यानंतर ‘लोकमत’शी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे आज दुपारीच भाजपाच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. या पक्ष प्रवेशादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत. तसेच, अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर सुद्धा भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मात्र, गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश करण्यात येणार असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांचीही तशीच इच्छा होती. मात्र, अचानक त्यांना राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश करावा लागत आहे. 

अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजपाचे वरिष्ठ नेते हजर असतील, मोठी सभा घेऊन आपली भूमिका अशोक चव्हाण मांडतील, अशी चर्चा होती. मात्र, राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजच हा पक्षप्रवेश होत आहे. कारण, राज्यसभा निवडणुकांसाठी भाजपला महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करायची आहे. तर, अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते. उत्तर प्रदेशासह राज्यातील भाजपा उमेदवारांच्या याद्या राज्यसभेसाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातील यादी अद्यापही वेटींगवरच आहे. दरम्यान, राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहे. त्यामुळेच, अशोक चव्हाण उद्याच राज्यसभेचा अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.

अशोक चव्हाण यांचा आज भाजपात प्रवेश होईल. त्यानंतर, सध्याकाळी भाजपाकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. त्यामध्ये, अशोक चव्हाण यांचे नाव आल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळेच, अशोक चव्हाण यांनी आजच स्थानिक भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित केले. दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर ते काय भूमिका मांडतात, त्यांच्यासमवेत किती आमदार भाजपात येतात, हेही पाहावे लागेल. 

टॅग्स :अशोक चव्हाणअमित शाहकाँग्रेसभाजपा