जागतिक नदी दिवस : राष्ट्रीय आदर्श नदी धोरण अवलंबणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 05:50 AM2020-09-27T05:50:17+5:302020-09-27T05:50:25+5:30

बाळासाहेब बोचरे  मुंबई : शेतीप्रधान भारत देशामध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी नदी हा महत्त्वाचा स्रोत असून तो कायम प्रवाही ...

The need to adopt a national ideal river policy | जागतिक नदी दिवस : राष्ट्रीय आदर्श नदी धोरण अवलंबणे गरजेचे

जागतिक नदी दिवस : राष्ट्रीय आदर्श नदी धोरण अवलंबणे गरजेचे

googlenewsNext

बाळासाहेब बोचरे 

मुंबई : शेतीप्रधान भारत देशामध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी नदी हा महत्त्वाचा स्रोत असून तो कायम प्रवाही व प्रदूषणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय आदर्श नदी धोरण तयार करणे गरजेचे आहे, असे जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. जागतिक नदी दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.

सध्या जलस्रोतांची अवस्था कशी आहे, असे वाटते?
कृषिप्रधान देशात गरिबीचे प्रमाण जास्त आहे. जागोजागी पाणी अडवून नदीचा प्रवाह खंडित करून नदीमधील पर्यावरणीय साखळी धोक्यात आणली आहे. शिवाय नद्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने भूगर्भात पाणी जिरवण्याची प्रक्रियाही विस्कळीत झाली आहे. औद्योगिकीकरणामुळे कारखान्यातील विषारी पाणी व शहरातील मैलामिश्रित पाणी थेट नदीत सोडले जाते. यामुळे भविष्यात आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

पर्यावरण, औद्योगिकीकरण आणि आरोग्य यांची सांगड कशी घालणार?
हिमालयातून येणाऱ्या नद्यांना अनेक वेळा कृत्रिम पूर येतात. हे पाणी नियंत्रित करणे किंवा दुसरीकडे वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवणे गरजेचे आहे. शिवाय पश्चिम महाराष्टÑामध्ये उगम पावणाºया नद्यांचे पाणी तुटीच्या क्षेत्राकडे वळवून नद्या वर्षभर प्रवाही ठेवता येऊ शकतात. शहरातील मैलामिश्रित पाणी व कारखान्यातील विषारी सांडपाणी नदीमध्ये सोडू नये यासाठी झीरो डिस्चार्ज धोरण आहे, पण त्याकडे दुर्लक्ष होते. वाळू धोरणाकडे शासनाने फक्त कमाईचे साधन म्हणून बघितल्याने वाळूचा वारेमाप उपसा होऊन पर्यावरणीय साखळी धोक्यात आली आहे. नदी कोरडी पडली की
अनेक जीव व वनस्पतींची साखळी खंडित होते.

पाणी अडवा, पाणी जिरवा धोरणाबद्दल काय सांगाल?
वास्तविक हे धोरण अत्यंत चांगले आहे. त्यामुळे जमिनीची धूप कमी होऊन धरणात येणारा गाळ कमी होऊ शकतो. पण अजूनही आपण त्यामानाने खूप मागे आहोत. जागतिक पातळीवर हेक्टरी दोन टन माती वाहून जाण्याचे प्रमाण आहे, ते आपल्याकडे १६ टन आहे.

नदीजोड प्रकल्प गरजेचाच...
२००२ साली केंद्र सरकारने हिमालयातून वाहणाºया नद्यांना येणारा कृत्रिम पूर व त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी नदीजोड प्रकल्प धोरण जाहीर केले. पण अद्याप त्याला गती आलेली नाही. नद्या बारमाही प्रवाही ठेवण्यासाठी हा प्रकल्प राबवणे अत्यंत गरजेचे आहे.

राज्यात मुबलक पाणी
महाराष्टÑात लहान-मोठ्या ३८० नद्या आहेत. त्यांची लांबी १९ हजार ४०० किमी. आहे. यातील बहुतेक नद्या या एक तर प्रदूषित आहेत किंवा कोरड्या आहेत. यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे पाणी कोरड्या क्षेत्राकडे वळवण्याची गरज आहे.

जागतिक नदी दिवस
सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा ‘जागतिक नदी’ दिवस म्हणून साजरा केला जातो. मार्क अंजेलो यांनी तसा प्रस्ताव दिला होता.

Web Title: The need to adopt a national ideal river policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.