NCP Student Congress demands to start college elections; meeting of Higher and Technical Education Minister Uday Samant | कॉलेज निवडणुका सुरू करण्याची राष्ट्रवादीची मागणी;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घेतली भेट

कॉलेज निवडणुका सुरू करण्याची राष्ट्रवादीची मागणी;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घेतली भेट

मुंबई :  कॉलेज निवडणुका बंद करून लोकशाही निवडणूक ही प्रक्रिया थांबणे योग्य नाही. या निवडणुका पुन्हा सुरू करण्याची काळजी राज्य सरकारने घ्यावी आणि विद्यार्थ्यांना निवडणूकीची संधी द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच मुंबई मधील "युवा संवाद" कार्यक्रम मध्ये केली होते.

आगामी शैक्षणिक वर्षापासून कॉलेज निवडणुका सुरू करण्याची मागणी प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अँड.अमोल मातेले यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे  केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मंत्री महोदयांची काल भेट घेऊन त्यांना  निवेदन दिल्याची माहिती मातेले यांनी लोकमतला दिली.

राज्यात 1994 पासून महाविद्यालयीन निवडणुका बंद आहेत. 'नवीन विद्यापीठ कायदा-2016'मध्ये निवडणुका खुल्या पद्धतीने घेण्याचा अंतर्भाव आहे. असे असताना या कायद्याची अंमलबजावणी मागील सरकारने केली नाही. दिखावा म्हणून निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संस्थाचालक, प्राचार्यांचा रोष नको म्हणून तसेच या निवडणुकीचा विरोधकांना फायदा होईल या भीतीने निवडणुका रद्द केल्या. यामुळे अनेक वर्षांपासून निवडणुकीची प्रतीक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांची नियमावलीसह वेळापत्रक कॉलेज सुरू होण्याच्या अगोदर राज्यातील सर्व विद्यापीठांनी जाहीर करावे, अशी मागणी अँड.अमोल मातेले यांनी मंत्री महोदयांना केली.

विद्यापीठांनी कॉलेज निवडणुकीची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू केल्यास निवडणुका दिवाळीपूर्वी पूर्ण होतील. दिवाळीपूर्वी निवडणूक पार पडल्यास संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल. यासाठी कॉलेज निवडणुकीबाबत राज्यातील सर्व विद्यापीठाना सूचना द्याव्यात, अशी मागणीही मातेले यांनी उदय सामंत यांच्याकडे केली. या मागणीची योग्य दाखल घेण्याचे आश्वासन यावेळी सामंत यांनी दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: NCP Student Congress demands to start college elections; meeting of Higher and Technical Education Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.