“...तर तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, नितेश राणे आज लाडके आहात पण...”; कुणी केली टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:54 IST2025-03-19T14:52:58+5:302025-03-19T14:54:24+5:30

NCP SP Group Rohit Pawar News: तुम्ही नेत्याला खूश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचे मोठे नुकसान करत आहात, अशी टीका करण्यात आली आहे.

ncp sp group rohit pawar criticized bjp leader nitesh rane | “...तर तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, नितेश राणे आज लाडके आहात पण...”; कुणी केली टीका?

“...तर तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, नितेश राणे आज लाडके आहात पण...”; कुणी केली टीका?

NCP SP Group Rohit Pawar News: औरंगजेबच्या कबरीविरोधात सुरु झालेल्या आंदोलनांमुळे नागपुरात एक अफवा पसरली आणि त्याचे रुपांतर दंगलीत झाले. दंगलखोरांनी पोलिसांवरही हल्ले केले. अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तलवारी, लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत दहशत पसरविण्यात आली. हा प्रकार मुख्यमंत्री, गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन नागपुरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. हिंसाचार करणाऱ्या अनेक वाहनांची तोडफोड करुन ती पेटवून दिली होती. त्यामुळे प्रशासनाला अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागला. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यातच नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.

मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे. या दंगलखोरांना त्यांचा 'पाकिस्तानातील अब्बा' आठवेल अशी कारवाई केली जाणार आहे. असा प्रकार घडल्यानंतर आमचे देवाभाऊंचे सरकार गप्प बसेल, असे तुम्हाला वाटते का? असा सवाल राणे यांनी केला. तसेच मी मुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. फडणविसांनी हस्तांदोलन करत हसत माझे स्वागत केले. मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतात, याची चिंता तुम्ही करु नका. मी तुमच्या घरात डोकावतो का? असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नितेश राणे यांच्यावर पलटवार केला. विधान भवनात ते पत्रकारांशी बोलत होते.

....तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही

मी नितेश राणे यांना महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो की, त्यांचे वय कमी आहे, ते मंत्री झाले आहे. पुढे अनेक काळ त्यांना राजकारण करायचे आहे. तुम्ही नेत्याला खूश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचे मोठे नुकसान करत आहात. फक्त देवेंद्र फडणवीस खूश व्हावेत, यासाठी तुम्ही वक्तव्य करत आहात. अशी फालतू विधाने करून महाराष्ट्रात अस्वस्थता पसरवत आहात आणि त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आहात, असे तुम्हाला वाटत असेल, तर हा लाडकेपणा काही दिवस पुरणारा आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी, सामान्य माणसाच्या हितासाठी काही केले, तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल. पण फक्त नेत्यांनी तुम्हाला डोक्यावर घ्यावे, यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे नुकसान करत असाल, तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, अशी टीका रोहित पवार यांनी केली. 

दरम्यान, कोरटकर, सोलापूरकरला पकडण्यासाठी सरकारला इच्छाशक्ती लागेल. सरकार या टुकार लोकांना पाठबळ देत आहेत आणि यांचे प्रमुख नेते शांतता ठेवा म्हणून सांगत आहेत. तर दुसरीकडे सरकारमधील लोक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. वातावरण गरम करणारे बोलून जाणारे दुसरे आहे. फक्त वातावरण दूषित करण्यासाठी औरंगजेबाचा विषय आणत आहेत, या शब्दांत रोहित पवार यांनी निशाणा साधला.

 

Web Title: ncp sp group rohit pawar criticized bjp leader nitesh rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.